००३ रूपाचें रूपस विठ्ठलनामवेष
रूपाचें रूपस विठ्ठलनामवेष ।
पंढरीनिवास आत्माराम ॥ १ ॥
पुंडलिकभाग्य वोळलें संपूर्ण ।
दिननिशीं कीर्तन विठ्ठल हरी ॥ २ ॥
त्रैलोक्य उद्धरे ऐसी पव्हे त्वरे ।
कीर्तन निर्धारे तरुणोपाव ॥ ३ ॥
पूण्य केलें चोख तारिले अशेख ।
जनीं वनीं एकरूप वसे ॥ ४ ॥
वेदादिकमति ज्या रूपा गुंतती ।
तो आणूनी श्रीपति उभा केला ॥ ५ ॥
निवृत्तीचा सखा विठ्ठलरूप देखा ।
निरालंब शिखा गगनोदरीं ॥ ६ ॥
सरलार्थ:
पंढरीत उभे ठाकलेले हे विठ्ठलाचे रूप व नामहि सर्व रूपवान सुंदर वस्तुंचे रूप आहे (हे असो रूपस। विश्व जेणे ।। ज्ञानेश्वरी ।) तसेच तो सर्व जीवांस रमविणारा आत्माहि आहे. ।।१।। पुंडलिकास हे सर्व भाग्य प्राप्त झाले आहे. कारण त्याच्या मुखातून दिवसरात्र श्रीहरि विठ्ठल या नामाचे संकीर्तन चालु आहे. ।।२।। तिन्ही लोकांचा उद्धार होईल अशी हि पाणपोई आहे या विठ्ठल नाम संकीर्तन हेच त्वरीत तरून जाण्याचे निश्चयात्मक साधन आहे. ।।३।। या नामसंकीर्तनानेच नामधारकांनी शुद्ध पुण्य करून सर्व जीव संसारसागरातून तारले आहे. त्यांना जनांत व वनातही एका देवाचेच रूप असल्याचे दिसत आहे. ।।४।। वेद शास्त्रांच्याहि बुद्धि ज्या स्वरूपाचे वर्णन करण्यात गुंतल्या आहेत तो लक्ष्मीपती श्रीहरि परमात्मा पुंडलिकाने येथे आणून उभा केला आहे. ।।५।। ते विठ्ठलाचे रूप श्रीनिवृत्तिनाथांचे आवडते असून ते आकाशालाहि पोटात घालून शेवटी निराश्रय स्वरूपांत स्थिर आहे (सर्वाचा आश्रय व स्वतः मात्र निराश्रय असे ते स्वरूप आहे). ।। ६ ।।
भावार्थ:
जगातील सर्व रुप ज्याच्या रुपामध्ये आहे असा श्री विठ्ठल तो आत्मस्वरुप परमात्मा पंढरीत राहतो. पुंडलिकाच्या भाग्याने तो साकार झाला म्हणुन रात्रंदिवस कीर्तन करण्याचा लाभ मिळाला. हेच ते कीर्तन त्रयलोकांना तारुन नेते. कीर्तनामुळे सर्व तरुन जातात व त्यांना जनी वनी तोच परमात्मा दिसु लागतो. त्या वेदांची मती ही ह्यांच्या रुपात गुंतुन पडते.तो लक्ष्मीपती पुंडलिकाने आणुन उभा केला आहे. निवृत्तिनाथ म्हणतात तो माझा सखा श्री विठ्ठल त्याचे निराकार ब्रह्म स्वरुप ज्योती स्वरुपाने गगनाच्या पोटात व्यापक स्वरुपात आहे.