००४ पाहतां साधन विठ्ठलकीर्तन
पाहतां साधन विठ्ठलकीर्तन ।
भक्तसंजीवन आत्माराम ॥ १ ॥
विठ्ठल सधर भिवरा तें नीर ।
नाम निरंतर केशवाचें ॥ २ ॥
शिवसुरवर चिंतिती सुस्वर ।
कीर्तनविचार पंढरीसी ॥ ३ ॥
निवृत्ति कीर्तन दिननिशीं ध्यान ।
मनाचें उन्मन इये रूपीं ॥ ४ ॥
सरलार्थ:
विचाराने पाहिले तर श्री विठ्ठल हे नामसंकीर्तन भक्तजनांस संजीवनी देणारे व आत्म्यास रमविणारे आहे. ।।१।। विठ्ठलाचा आधार, चंद्रभागेच्या उदकाचे स्नान व केशव श्रीहरिचे अखंड नाम, ।।२।। असा श्रीशंकर व सर्व देव देवतांचा चिंतनाचा विषय असून गोड आवाजाने ते पंढरित कीर्तन करतात. ।।३।। निवृत्तिनाथही याच विठ्ठल कीर्तनाचे सतत ध्यान करतात व त्या रूपातच त्यांचे मन उन्मन अवस्थेस प्राप्त झाले (जागृतादि तीन व तूर्या चार आणि उन्मनी ही पांचवी अवस्थाहि नामानेच प्राप्त होते). ।।४।।
भावार्थ:
ईश्वर प्राप्तीची अनेक साधने आहेत पण कीर्तन ह्या साधनामुळे भक्त आत्मारामाला प्राप्त करुन अमर होऊ शकतात. भक्त त्यासाठी चंद्रभागेत स्नान करुन बाह्य सुर्चिभूतता व तेच जल जठरात घेऊन आतील सुर्चिभूतता करुन सतत विठ्ठल नामाचे संकीर्तन करतात. आदिनाथ महादेव सर्व देवांना सोबत घेऊन सुस्वरे पंढरी क्षेत्रात कीर्तन करत असतात. निवृत्तीनाथ म्हणतात मी रात्रंदिवस संकीर्तन करुन माझे मन उन्मनी अवस्थेत विठ्ठल स्वरुपाला प्राप्त होते.