००५ मन कामना हरि मनें बोहरी
मन कामना हरि मनें बोहरी ।
चिंतितां श्रीहरि सुखानंद ॥ १ ॥
तें पुंडलिक तपें वोळलें स्वरूप ।
जनाचीं पै पापें निर्दाळिली ॥ २ ॥
वेणुनाद तीर्थ चंद्रभागा समर्थ ।
विठ्ठल दैवत रहिवास ॥ ३ ॥
निवृत्ति साकर विठ्ठल आचार ।
भिवरा तें नीर अमृतमय ॥ ४ ॥
सरलार्थ:
श्रीहरि विठ्ठलाचे चिंतन केले असता वासनेसह मनाचा नाश होऊन स्वात्म सुखाचा आनंद प्राप्त होतो. ।।१।। असे हे विठ्ठलाचे रूप भक्त पुंडलिकाच्या तपाने आपणहून आले व त्याने सर्व जीवांची पापे नष्ट केली. ।।२।। पंढरितील वेणूनाद तीर्थ व पापनाश करून पवित्र करण्यास बलवान अशी चंद्रभागा आणि विठ्ठल हे महान दैवत यांचा पंढरित निवास आहे. ।।३।। तो विठ्ठलाचा सर्व आचारधर्म निवृत्तिच्या ठिकाणी आकारास आला आहे व भिवरेचे पाणी म्हणजे या मृत्युलोकातील अमृतच आहे. ।।४।।
भावार्थ:
हरिच्या चिंतनाने सुखानंद प्राप्त होतो त्या मुळे मनाचे त्यातील इच्छांसकट हरण होऊन मन त्या स्वरुपाला प्राप्त होते इच्छा उरतच नाहीत. हे पुंडलिकाचे उपकार आहेत ज्यामुळे जनांच्या पापाचे निर्दाळण करण्यासाठी परब्रह्म स्वरुपाला प्राप्त झाले. जेथे वेणुनाद झाला असे चंद्रभागा तीर्थ त्याच्या रहिवासामुळे समर्थ झाले. निवृत्तीनाथ म्हणतात की भिवरेच्या अमृतमय तीर्थामुळे ते विठ्ठल रुप मला सगुण साकार रुपात मिळाले.