००६ निराकार वस्तु आकारासि आली

निराकार वस्तु आकारासि आली ।
विश्रांति पैं जाली विश्वजना ॥ १ ॥
भिवरासंगमीं निरंतर सम ।
तल्लीन ब्रह्म उभें असे ॥ २ ॥
पुंडलिक ध्याये पुढत पुढती सोये ।
विठ्ठल हेंचि गाये संकीर्तनीं ॥ ३ ॥
निवृत्तिसंकीर्तन ब्रह्म हें सोज्वळ ।
नाम हें रसाळ अनिर्वाच्य ॥ ४ ॥

सरलार्थ:

निर्गुण निराकार परब्रह्म सगुण साकार होऊन विटेवर उभे राहिल्याने जगातील सर्व जनतेस विसावा प्राप्त झाला आहे. ।।१।। नीरा भीवरेच्या संगमावर अखंड समपाय दृष्टी व कटेवर कर ठेवून भक्तिभावात एकरूप झालेले ते परब्रह्म तेथे उभे आहे. ।।२।। आपले पुढील भवितव्य सुखाचे व्हावे यासाठी भक्त पुंडलिकाचे ध्यान करावे व विठ्ठल या नामाचेच किर्तन करावे. ।।३।। श्री निवृत्तिनाथ म्हणतात विठ्ठल नामसंकीर्तन हेच शुद्ध चकचकीत असे ब्रह्म आहे. कारण ते नाम आनंदभरित व त्याचे फळ व महिमा वाचेच्या पलिकडचा (वर्णन करण्यापलिकडचा) आहे. ।।४।।

भावार्थ:

निर्गुण निराकार वस्तुरुप ब्रह्म हे विठ्ठल रुपात सगुण साकार रुपात आले त्यामुळे विश्वजनाना मोक्षरुप विश्रांती घेता येईल. चंद्रभागेतीरी समचरण समदृष्टी स्वरुपातील विठ्ठल भक्त भेटीसाठी तल्लीन होऊन उभे टाकले आहे. नाम संकीर्तनातुन पुंडलिक ह्याचे गायन करुन ह्यांचे ध्यान करतात. निवृत्तिनाथ म्हणतात हे सोज्वळ ब्रह्म मी रसाळपणे अनिर्वाच्च रुपात कीर्तनात सांगत आहे.

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *