००७ पुंडलीकपेठ वैष्णवाचा हाट

पुंडलीकपेठ वैष्णवाचा हाट ।
करिती बोभाट हरिनामाचा ॥ १ ॥
वाळलें अंबर अमृततुषार ।
झेलीत अमर चकोर झाले ॥ २ ॥
देव मुनी सर्व ब्रह्मादिक लाठे ।
पंढरीये पेठे प्रेमपिसे ॥ ३ ॥
निवृत्ति निर्वाळिला ज्ञानदेव सोपान ।
खेचर तल्लीन वीनटला ॥ ४ ॥

सरलार्थ:

भक्त पुंडलिकाच्या गल्लीत भरलेला हा वैष्णव भक्तांचा बाजार असून ते हरिनाम घ्या हरिनाम घ्या अशा आरोळ्या देत आहेत. ।।१।। अमृताच्या थेंबाचा वर्षाव करणारे महाकाश आता प्रसन्न झाले आहे. व ते वरचेवर झेलणारे नामधारक चकोर त्या अमृताचे सेवन करून अमर झाले आहे. ।।२।। सर्वच्या सर्व देव, मुनि व ब्रह्मदेवादि मोठमोठे या पंढरिच्या बाजारगल्लीत मुग्ध होऊन वेडावले आहेत. ।। ३ ।। निवृत्ति, ज्ञानदेव, सोपान, विसोबा खेंचर हे तेथे शुद्ध होऊन शरण आले आहे. ।।४।।

भावार्थ:

पुंडलिक सर्व संतांच्या मेळाव्यात पंढरीच्या पेठेत हरिनामाचा गजर करत आहेत चंद्राने केलेल्या अमृत वर्षावा मुळे जसे चकोर पक्षी अमर होतात तसे आकाशातुन ब्रह्म भक्तांवर अमृत वर्षाव करते. ब्रह्मादिक, ऋषी, मुनी पंढरी तील भक्तीचा गजर ऐकुन पीसे होतात. भक्तीपीसे त्यांना लागते. निवृत्तिनाथ म्हणतात त्यांच्या सकट ज्ञानेश्वर सोपान विसोबा खेचर भक्तीने विठ्ठल रुपात लीन झाले.

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *