००८ विठ्ठल श्रीहरि उभा भीमातीरीं

विठ्ठल श्रीहरि उभा भीमातीरीं ।
तिष्ठती कामारी मुक्तिचारी ॥ १ ॥
मुनिजनां सुख निरंतर लक्ष ।
भक्तां निजसुख देत असे ॥ २ ॥
पुंडलिकपुण्य मेदिनीकारुण्य ।
उद्धरिले जन अनंत कोटी ॥ ३ ॥
निरानिरंतर भीमरथी तीर ।
ब्रह्म हें साकार इटे नीट ॥ ४ ॥
नित्यता भजन जनीं जनार्दन ।
ब्रह्मादिक खुण पावताती ॥ ५ ॥
निवृत्ति तत्पर हरीरूप सर्व ।
नाम घेतां तृप्त आत्माराम ॥ ६ ॥

सरलार्थ:

श्रीहरि विठ्ठल हा भीमानदीच्या तीरावर उभा असून त्याच्या समोर सलोकता, समीपता, सरूपता व सायुज्यता या चारहि मुक्ती काम करणाऱ्या दासी म्हणून दारांत उभ्या आहेत. ।।१।। तो श्रीहरि मुनिजनावर लक्ष ठेवून त्यांना अखंड आत्मसुख तर भक्तांना प्रेम सुख देत आहे. ।।२।। पुण्यशील पुंडलीकास या पृथ्वीचीच दया आली व त्याने अनंत कोटी जीवांचा उद्धार केला आहे. ।।३।। एकत्र झालेल्या निरा भीवरेचे काठी सगुण साकार स्वयंभू-सिद्ध ब्रह्म अखंड विटेवर उभे आहे. ।।४।। जडजीव अशा जनामध्ये जनार्दन भरला आहे अशा भजनाचे वर्म ब्रह्मदेवादिकास कळले आहे. ।।५।। सर्व हरिरूप आहे. या रहस्यात श्रीनिवृत्ति सावध आहे व त्या भूमिकेवरून नाम घेतले असता आपला आत्माराम संतुष्ट होतो. ।।६।।

भावार्थ:

ज्या पंढरीत श्री विठ्ठल उभे आहेत तिकडे चारी मुक्ति कामारी दासी होऊन तिष्टत आहेत. मुनिजन जेथे लक्ष केंद्रीत करुन जे सुख निरंतर भोगतात तेच सुख पंढरीत भक्तांना मिळते पुंडलिकाने पुण्य पृथ्वीवर करुणा दावुन हे ब्रह्मस्वरुप पंढरीत भक्तजनांच्या उध्दारासाठी पंढरीत आणले. त्या पंढरीत निराभिवरे तीरावर हे परब्रह्म विटेवर उभे आहे. ब्रह्मादिकांनी खुण सांगितली आहे की हे ब्रह्म भजनामुळे जगत रुपात पाहता येते. निवृत्तिनाथ म्हणतात तत्परतेने नाम घेचल्यास तो आत्माराम तृप्त होतो.

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *