००९ भवजळ काया पंचतत्त्वमाया
भवजळ काया पंचतत्त्वमाया ।
भजन उभया पंढरीरावो ॥ १ ॥
तारक पंढरी प्रत्यक्ष भीमातीरीं ।
ब्रीदें चराचरीं बोले वेदु ॥ २ ॥
माया मोहजाळ ममता निखळ ।
सेवितां सकळ होय हरी ॥ ३ ॥
निवृत्तीचें फळ सकळ हा गोपाळ ।
तोडी मायाजाळ संकीर्तने ॥ ४ ॥
सरलार्थ:
मायाकार्य संसार सागर रूप पाणी आधारातून निर्मित शरीर पंचमहाभूतांचा (पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश) या दोन्हीतूनही तरून जाण्यास पंढरिनाथाचे भजनच साधन आहे. ।।१।। चंद्रभागा तीरावरील पंढरिक्षेत्र हे तारक आहे हे प्रतिज्ञा वचन वेद सर्व चराचरांस सांगत आहे. ।।२।। मायाकार्य, संसारिक मोहाचे पसरलेले जाळे तसेच अनित्य वस्तुंचे ममत्त्व-माझेपण हे सर्व या श्रीहरिची सेवा केली असतां हरिरूपच होते. ।।३।। निवृत्तिनाथांच्या जन्माचे फळ हे सर्व तो गोपाळच आहे व तो नामसंकीर्तनाने सर्व मायापाश तोडून टाकतो. ।।४।।
भावार्थ:
पंचतत्वाने बनलेला देह हा भवसागरातील पाणी आहे. व ह्या जळातुन तरण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे पंढरीरावाचे भजन आहे. भवसागरातुन तरण्यासाठी तारक पंढरीत आहे असे वेद सांगतात. ह्या परब्रह्माच्या सेवे मुळे माया, ममता, मोहजाळातुन सुटका होते. निवृत्तिनाथ म्हणतात ह्याच्या संकीर्तनामुळे माया मोहाचा पाश मला तोडता आला हे साधनेचे फळ आहे.