०१६ पिंड हा न धरी ब्रह्मार्पण करी
पिंड हा न धरी ब्रह्मार्पण करी ।
विष्णु चराचरीं ग्रंथीं पाहे ॥ १ ॥
तें रूप विठ्ठ्ल ब्रह्माकार दिसे ।
पंढरी सौरस भींमातीरीं ॥ २ ॥
जगाचे तारक पूण्य पूज्य लोका ।
तृप्त सनकादिक नामें होती ॥ ३ ॥
पतीतपावन नाम हे जीवन ।
योगीयाचें ध्यान हरि आम्हां ॥ ४ ॥
वेणुनादीं काला पिंडावती जाला ।
भाग्य भोगियला दृष्टी पूढें ॥ ५ ॥
निवृत्ति म्हणे ते रूपडें अनंत ।
विठ्ठल संकेत तरुणोपेव ॥ ६ ॥
सरलार्थ:
या शरीररूप पिंडाच्या आकाराचा मोह धरु नकोस ते शरीर ब्रह्मस्वरूपास अर्पण कर कारण तो परब्रह्म स्वरूप विष्णुच चराचर वस्तुमध्ये व्यापून आहे. हे ग्रंथामध्ये तू पाहा. ।।१।। ते विठ्ठलाचे रूप ब्रह्माच्या आकाराने दिसते. पंढरीत हा सुखाचाच मेवा-प्रेमभाव भीमेच्या तिरावर आहे. ।।२।। जगाला तारणारा व लोकांना पुण्यरूप व पूज्य असे ते आहे व सनकादिक त्याच्या नामाने तृप्त झाले आहे. ।।३।। आम्हा योगीजनांचे ध्यान असा तो श्रीहरि असून पापी जीवांना पवित्र करणारे त्याचे नाम जीवन आहे. ।।४।। वेणुनादस्थळी गोपाळपुरी पिंडावती नदिच्या तिरावर काला झाला तो आम्ही आमच्या भाग्याने दृष्टिने पाहिला व सेवनहि केला. ।।५।। श्रीनिवृत्तिनाथ म्हणतात ते अनंत श्रीहरिचे रूप विठ्ठल या संकेताने संसारातून तरण्याचा एकमेव मार्ग आहे. ।।६।।
भावार्थ:
देह तादात्म्य सोडुन हा देह देवाच्या कारणी लावावा हा अनुभव जगतातील सर्व ग्रंथ सांगत आहेत. असे हे ब्रह्माकार रुप भक्तांकरिता भीमातीरी श्री विठ्ठल रुपाने साकारले आहे. जगाला तारणारे सनकादिक संत हे नाम घेतल्याने तृप्त झाले आहेत. योग्यांचे ध्येय असणारे हे नाम पतित पावन व जिवनदायी आहे. ह्याच्या वेदुनादाने माझे देह तादात्म्य संपवुन मला भाग्य भोगायला पात्र केले. निवृत्तिनाथ म्हणतात अनंत रुप विठ्ठलाचे संकेत प्राप्त करणे हा तरणोपाय आहे.