०१९ ध्येय ध्यान मनीं उन्मनीं साधनीं

ध्येय ध्यान मनीं उन्मनीं साधनीं ।
लाविता निशाणी ध्यानमार्गे ॥ १ ॥
तें रूप सघन गुणागुणसंपन्न ।
ब्रह्म सनातन नांदे इटे ॥ २ ॥
विठ्ठलनामसार ऐसाचि निर्धार ।
मुक्ति पारावार तीं अक्षरीं ॥ ३ ॥
निवृत्ति निवांत राहिला निश्चित ।
केलेंसे मथीत पुंडलिकें ॥ ४ ॥

सरलार्थ:

ध्येय स्वरूप श्रीहरिचे मनाने ध्यान केले असतां उन्मन अवस्था साध्य होते व तिचे निशाण ध्यान मार्गानेच लागते. ।।१।। ते घनरूप सहा गुण व अगुण संपन्न ते ऐश्वर्यासह सगुण निर्गुणसंपन्न रूप नित्य परब्रह्म विटेवर नांदत आहे. ।।२।। विठ्ठल हे नाम साररूप आहे असाच निश्चय आहे. मुक्तिचा संपूर्ण विचारहि या तीन अक्षरातच आहे. ।।३।। त्यामुळे निवृत्ति हि त्या नामावर निश्चित स्थिर राहिला आहे कारण ते पुंडलिकाने काढलेले सार आहे, लोणी आहे. ।।४।।

भावार्थ:

ध्येय ध्यान ध्याता ही त्रिपुटी निरास पावली की उन्मनी अवस्था प्राप्त होते. त्याची निशाणी हे योगी ध्यान मानतात.योग्यांचे ते ध्यान जे सर्व गुणांनी युक्त आहे तेच विटेवर उभे आहे. त्यामुळे श्री विठ्ठल नाम हेच सार असा निर्धार करुन ती मुक्ती प्राप्त झाली आहे. तोच हा परमात्मा आहे हे पुंडलिकाने सांगितल्यामुळे निवृत्तिनाथ निवांत राहिले.

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *