०२६ नुघडितां दृष्टि न बोले तो वाचा

नुघडितां दृष्टि न बोले तो वाचा ।
हरिरूपी वाचा तल्लीनता ॥ १ ॥
उठि उठिरे नाम्या चालरे सांगातें ।
माझे आवडते जीवलगे ॥ २ ॥
कुरवाळीला करें पुसतसे गूज ।
घेई ब्रह्मबीज सदोदित ॥ ३ ॥
ज्ञानासि लाधलें निवृत्ति फावलें ।
सोपाना घडलें दिनकाळ ॥ ४ ॥
तें हें रे सखया खेंचरासि पुसे ।
गुरुनामी विश्वासे ब्रह्मरूपें ॥ ५ ॥
निवृत्ति म्हणे आतां अनाथा श्रीहरि ।
तूंचि चराचरी हेचि खुण ॥ ६ ॥

सरलार्थ:

नामदेव डोळेहि उघडीना व वाणीनेहि बोलेनात कारण ते खरोखरच हरिच्या स्वरूपांत एकरूप झाले होते. ।।१।। नामदेवा आता उठ व आमच्या बरोबर चाल. माझा अति आवडता व जीवाचा जिव्हाळा असा तू आहेस. ।।२।। आपला हात नामाच्या तोंडावरून फिरवला व त्यास सर्व विश्वाचे आद्य ब्रह्म कायम स्वरूपाचे दिले. ।।३।। ते ज्ञानदेवास मिळाले निवृत्तिस आपोआप प्राप्त झाले व सोपान देवास सदैवच ते घडले. ।।४।। तेच हे सख्या मित्रा तूं विसोबा खेचरास विचार कारण ते तुझे गुरू आहेत व गुरू हे ब्रह्मस्वरूपच असल्याने त्यांच्यावर विश्वास ठेव. ।।५।। निवृत्तिनाथ म्हणतात – अनाथासाठी असलेला श्रीहरि तूच सर्व चराचरात- जडचेतनांत भरून उरला आहे हीच खूण रहस्य आहे. ।।६।।

भावार्थ:

काल्याच्या आनंदात देहभान हरवलेले नामदेव राय डोळे ही उघडत नव्हते व बोलत ही नव्हते. त्या हरिरुपात ते पूर्ण तल्लीन झाले होते. तेंव्हा देव म्हणाले माझ्या आवडत्या जीवलगा नामया आता भानावर ये. देवाने नामयाला हाती धरुन करुवाळले व हे सर्वांचे बीज असलेले नाम ब्रह्म सदोदित भोगायला सांगितले. ह्याच नामब्रह्माचा लाभ ज्ञानदेव निवृत्तिनाथ तर घेतातच तसेच सोपानदेव ही दिवसरात्र अनुभवतात. ते हे नाम ब्रह्म कसे भोगायचे हे तु तुझे गुरु खेचर ह्यांना विचार व सदगुरुंच्या उपदेशाचा बोध विश्वासाने घेऊन तु त्याला प्राप्त तुच ब्रह्मरुप होशिल.निवृत्तिनाथ म्हणतात हे अनाथांच्या नाथा हे श्रीहरि तुच एकत्वाने पूर्ण चराचरात भरला आहेस.

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *