०२८ काला तंव निकटी श्रीरंग जाले
काला तंव निकटी श्रीरंग जाले ।
भक्तांचे सोहळे पुरविले ॥ १ ॥
वेणुनादीं काला एकत्र पैं जाला ।
दहींभात झेलाझेलीतु देव ॥ २ ॥
तोचि कवळु घेत नामयासी देतु ।
ज्ञानासी भरीतु पूर्णतोषें ॥ ३ ॥
निवृत्ति सोपान कालवले कालीं ।
खेचराची धाली ताहान भूक ॥ ४ ॥
सरलार्थ:
त्या काल्याच्या प्रसंगी श्रीरंग श्रीहरि भक्तांच्या जवळ आले व त्यांनी भक्ताचे सोहळे पूर्ण केले. ।।१।। वेणूनादतीर्थावर गोपालपुरी हा काला एकत्र झाला दहीभाताचा तो काला देव उधळून झेलाझेली करू लागले. ।।२।। तोच घास घेवून नामदेवास देवू लागले व ज्ञानदेवासही पूर्ण प्रसन्नतेने भरवू लागले. ।।३।। निवृत्ति सोपान त्या काल्यात एकत्र कालवले गेले व खेचराची तहान व भूक तृप्त झाली. ।।४।।
भावार्थ:
भक्तांची निकटता अनुभवण्यासाठी भगंवताने काला केला.व सर्व भक्तांच्या देवाच्या सहवासाची इच्छा पूर्ण केली. काला म्हणजे एकत्रीकरण असा एकत्र केलेला काला देवांने वेणुनाद तीर्थावर म्हणजे भीमातीरी केला.जीव व ब्रह्माचे प्रतिक अ़सणारे दही व भात करुन त्याचे घास बनवले व ते भक्तांनी वरच्यावर मुखातच झेलले. कण ही वाया जाऊ दिला नाही.त्याच काल्याचा घास करुन ज्ञान व आनंदाला एकत्र करुन तो घास देवाने नामदेवरायांना दिला. निवृत्तिनाथ म्हणतात काल्याच्या आनंदात ते ही कालवले गेले म्हणजे एकरुप झाले. तसेच विसोबा खेचर ही आपली तहानभूक विसरला.