०३१ आपुलेनि हातें कवळु समर्पी
आपुलेनि हातें कवळु समर्पी ।
ब्रह्मार्पण मुखीं ब्रह्मपणे ॥ १ ॥
सोपान सावंता निवृत्ति निधान ।
यासि जनार्दन कवळ देतु ॥ २ ॥
ब्रह्मपद हरि बाह्य अभ्यंतरीं ।
सर्वत्र श्रीहरि दिसे तया ॥ ३ ॥
देऊनि हस्तक पुशी पीतांबरें ।
पुसतसे आदरें काय आवडे ॥ ४ ॥
राहीरखुमाबाई कासवीतुसार ।
अमृत सार सर्वाघटी ॥ ५ ॥
निवृत्ति खेचर सोपान सांवता ।
हरि कवळु देतां तृप्त जाले ॥ ६ ॥
सरलार्थ:
स्वतः ब्रह्मच ब्रह्मरूप काल्याचे समर्पण ब्रह्म रूप मुखात करीत होते. ।।१।। सोपान सावता, निवृत्ति यांना स्वतः जनार्दन श्रीहरि कवळ- घास देत होता. ।।२।। ब्रह्मस्वरूप श्रीहरि हा बाहेर व आंतहि असा सर्व ठिकाणीच त्यांना श्रीहरि दिसत होता. ।।३।। हाताने तो काला त्यांच्या मुखात देवून आपला हात पीतांबराने पुसतच आपणास काय आवडते असे विचारित होता. ।।४।। राही व रुखमाई या कासवी प्रमाणे अमृताचे सार सर्व वस्तुमात्रामध्ये पाहात होत्या. ।।५।। निवृत्ति सोपान सावता हे श्रीहरिने घास दिल्याने तृप्त व कृत्य कृत्य झाले होते. ।।६।।
भावार्थ:
श्री विठ्ठल आपल्या हातानी भक्तांच्या मुखात ब्रह्मरुप काल्याचा घास घालुन तो ब्रह्मार्पण करत आहे. सोपान सांवता निवृत्ती ह्यांसर्व भक्तांच्या मुखात ब्रह्मरुप काल्याचा घास स्वतः श्रीहरि भरवत आहे. श्रीहरीने दिलेल्या ह्या काल्याच्या प्रसादामुळे त्यांना अंतर बाह्य ब्रह्मस्वरुप दिसायला लागले. मग देव ह्या भक्तांच्या मस्तकावर हात ठेऊन त्यांचे मुख स्वतःच्या पीतांबराने त्यांचे मुख पुसुन त्यांना लडिवाळपणे विचारत आहे की तुम्हाला अजुन काय हवे आहे. जशी कासवी आपल्या दृष्टीने तिची पिल्ल पाळते तश्या प्रेम वात्सल्याने राही रखुमाई काला प्रसंगी आपल्या भक्तांना प्रेम पान्ह्याचे अमृत सार रुपात देत आहेत. निवृत्तिनाथ म्हणतात देवांने आपल्या हाताने काल्याचा घास दिल्याने मी, विसोबा खेचर, सोपानदेव व सांवतामहाराज तो प्रसाद घेऊन तृप्त झालो.