०३२ उपजे तें मरे मरे तें तें झुरे

उपजे तें मरे मरे तें तें झुरे ।
जन्म येरझारे एकरूपें ॥ १ ॥
तें हें कृष्णनाम गोपीसंगें मेळे ।
नंदाघरी सोहळे बाळक्रीडा ॥ २ ॥
अमर अमरे अमरकंद खरे ।
होऊनि गोजिरें दूध मागे ॥ ३ ॥
निवृत्ति परिचार सर्व हा गोपाळ ।
पूजी दिनकाळ आत्माराम ॥ ४ ॥

सरलार्थ:

जन्मते ते मरते व मरते ते झुरते अशा जन्ममरणाच्या येरझारा जेथे एकरूप होतात ।।१।। तो जन्ममरणातीत श्रीकृष्ण गौळणीच्या संगतीत त्यांच्या बरोबर; नंदाच्या घरी जन्म घेवून बाळलीलेचे सोहळे करतो ।।२।। अमृत सेवन करणारे अमर जे देव त्यांचा देव व खरोखरीच जो अमरत्वाचा-अमृताचा कंद म्हणजे मूळ आहे. तो आकर्षक कोमल रूप धरून यशोदेकडे दूध मागतो ।।३।। निवृत्तिच्या सेवेचे स्थान हा सर्वरूपाने श्रीहरि गोपाल आहे. तो रात्रंदिवस त्या आत्मस्वरूप श्रीकृष्णाचेच पूजन करतो ।।४।।

भावार्थ:

जन्मले ते मरते मरते ते जन्मते ह्या जन्ममरणाच्या चक्रात एकत्वाने फक्त निर्गुण आत्मा आहे. तो निर्गुण आत्माराम गोकुळात नंदा घरी गोपिकांसह बाळक्रीडा करत आहे व ते जगासाठी सोहळाच आहे.असे हे अमर आत्मतत्व म्हणजे अमरत्वाचा कंदच झाला आहे. असे ते आत्मतत्व स्वतःच यशोदेकडे दुध मागत आहे. निवृत्तिनाथ म्हणतात असा हा आत्माराम आपल्या सानिध्यातुन चराचरात तोच आहे याची जाणीव करुन देत आहे. अशा त्या परमात्म्याची मी नित्य पूजा करतो.

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *