०३३ धीराचे पैं धीर उदार ते पर
धीराचे पैं धीर उदार ते पर ।
चोखाळ अमर अभेदपणें ॥ १ ॥
तें हें चतुर्भुज कृष्णरूपें खेळे ।
माजि त्या गोपाळें छंदलग ॥ २ ॥
किडाळ परतें चोखाळ अरुतें ।
मी माझें हे कर्ते तेथें नाहीं ॥ ३ ॥
निवृत्ति धर्मता विचारे चोखाळ ।
सर्वत्र गोपाळ सखा आम्हां ॥ ४ ॥
सरलार्थ:
धैर्यालाही धैर्य देणारा व उदार म्हणण्याच्याहि पलिकडचा शुद्ध व अभिन्न असा देव ।।१।। तो हा चारभुजांचा देव श्रीकृष्ण रूपात खेळत आहे व त्या गोपाळामध्ये बाळ हट्ट करीत आहे ।। २।। वाईट ते दूर व चांगले ते जवळ मी व माझेपणा आणि कर्माचा अभिमान हे कांहीच जेथे नाही अशीही बाळलीला आहे ।।३।। निवृत्तिनाथांनी हा शुद्ध धर्मशीलपणा विचारात घेतला व सर्व ठिकाणी हा श्रीकृष्णच आमचा जीवाचा मित्र आहे असा निश्चय केला ।।४।।
भावार्थ:
धीरगंभीर असलेले परमतत्व उदारांचा राणा आहे प्रेमसुखाची जगतावर बरसात करत आहे. असे हे परब्रह्म गुणातीत निर्दोषस्वरुपात एकत्वाचे दर्शन घडवत आहे. ते चतुर्भुज परमतत्व कृष्णरुप गोपाळांना आपल्या कृष्णरुपाचा छंद लावुन त्यांच्या सोबत खेळत आहे. कोणत्याही वाईटाचा डाग नसलेले चोख निर्मळ असलेले हे ब्रह्म या ठिकाणी मी माझे असा कोणताही भेद करत नाही. व कोणत्याही कर्तेपणाचा लेश लाऊन घेत नाही.निवृत्तिनाथ म्हणतात की धर्माचा शुध्द विचार चोखपणे करुन असलेला तो गोपाळ माझा सखा आहे.