०३४ विश्रामधर्मता आश्रमपूर्णता

विश्रामधर्मता आश्रमपूर्णता ।
आपरूप कथा निमे जेथें ॥१॥
तें हें कृष्णबाळ गोपिकांसि खेळे ।
नंदाघरीं सोहळें आनंदाचे ॥२॥
कथा त्या कथितां पूर्ण त्या मथिता ।
अरूप अच्युता सर्व असे ॥३॥
निवृत्ति समाधान कृष्ण हें चोखडें ।
मनोनिग्रह खोड चरणीं गोवी ॥४॥
सरलार्थ:
धर्माचरण हीच विश्रांति व पूर्णबोध हाच आश्रम असल्याने जेथे आप-पर भावाची गोष्टच नाहिसी होते ।।१।। ते हे श्रीकृष्ण बाळ गौळणी संगे खेळते व हे आनंदाचे सोहळे नंदाच्या वाड्यात होतात ।।२।। त्याच्या त्या बाळलीला सांगता व पूर्णपणे मंथन विचार केला असता श्रीकृष्ण रूपरहित व कधीहि च्यूत न होणारा असा सर्वांगाने आहे असे दिसते ।।३।। हे शुद्ध बाळकृष्णाचे शुद्ध स्वरूप निवृत्तिचे समाधान आहे व त्या पायाशी मनाला जखडून बांधून घेणे हीच त्याला खोड आहे हाच त्याचा स्वभाव आहे ।।४।।
भावार्थ:
धर्माची विश्रांती व आश्रम व्यवस्थेतेची पूर्णता ह्याच्याच ठिकाणी होत असते. अशा त्या परमात्म्याने आत्मरुपाचे ज्ञान दिले तेंव्हा स्वस्वरुप त्यात मावळुन गेले. तेच हे परमात्मस्वरुप कृष्णस्वरुपात गोपिंकांबरोबर नंदाच्या घरात खेळले तेंव्हा नंदाचे घर आनंदात न्हाले. अशा त्या अरुप, अकर्तुम परमात्म्याची कथा केली तर करणाऱ्याला पूर्णत्व मिळते. निवृतिनाथ म्हणतात मनोनिग्रह करुन मी ह्याच्या चरणी एकरुप झाल्यावर मला त्यांचे शु्ध्द स्वरुप दिसले त्यामुळे मला समाधान प्राप्त झाले.