०३७ स्थिर धीर निर सविचारसार

स्थिर धीर निर सविचारसार ।
ब्रह्मांड आगर गोपवेषें ॥ १ ॥
तो हा कृष्ण सखा नंदाघरीं देखा ।
यशोदे सन्मुखा दूध मागे ॥ २ ॥
कळिकाळ कळिता काळ आकळिता ।
आपण स्वसत्ता विश्व हरी ॥ ३ ॥
निवृत्ति निकट ज्ञानदेव धीट ।
खेचरासि वाट गुरुनामें ॥ ४ ॥

सरलार्थ:

न ढळणारे, निर्विकार, निर्मळ सर्व विचारांचे सार व ब्रह्मांड साठा असे जे परब्रह्म गाई राखणाऱ्या गोपाळाच्या वेषाने नटले आहे ।।१।। तो हा जीवलग श्रीकृष्ण नंदाच्या घरी यशोदे समोर उभा राहून दुध मागत आहे पाहा हे केवढे आश्चर्य आहे ।। २।। कळिकाळ आपल्या शक्ति नेत्रास देत असता व काळ सर्वांना व्यापत असतां आपल्या सत्तेने विश्वाला वर का देतो हे नवलच आहे ।।३।। निवृत्तिच्या जवळ ज्ञानदेव धीटपणे असून विसोबा खेचरास त्याने गुरुमार्गाची वाट दाखविली आहे ।।४।।

भावार्थ:

तो गोपवेष घेऊन आलेला परमात्मा म्हणजे निर्गुण, शांत, स्थिर, सर्व विचारांचे सार व ह्या ब्रम्हांडाचे उत्पत्ती स्थान आहे. तो हा सखा कृष्ण नंदाघरी यशोदे कडे दुध मागताना पाहु शकता. तोच आपल्या सत्तेने कळिकाळाला धरुन ठेवतो व काळाची शक्ती त्याच्या आधिन असते.निवृत्तिनाथ म्हणतात त्याच्या आकलनामुळे ज्ञानदेव ब्रह्मैक्याला व खेचर गुरु कृपेने ब्रह्म वाटेला लागले.

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *