०३९ पियुषी पुरतें कासवी ते विते

पियुषी पुरतें कासवी ते विते ।
संपूर्ण दुभतें कामधेनु ॥१॥
तेंचि हें डोळस सांवळे सुंदर ।
यशोदे सकुमार बाळकृष्ण ॥२॥
मधुर क्षारता माधवीं अखंड ।
दिनकाळ प्रचंड आत्माराम ॥३॥
निवृत्तिचें ताट पियूष पुरतें ।
कांसवी दुभतें वाढियेसि ॥४॥
सरलार्थ:
पूर्ण अमृत स्वरूप प्रेम कासवी आपल्या पिलांना देते. व कामधेनू सर्व वस्तूचे दूध देते ।।१।। तेच प्रेम देणारे हे सुंदर, सावळे डोळ्यांना सुखविणारे कोमल श्रीकृष्ण यशोदेचे बाळ आहे ।। २।। गोड असा चविष्ट खारटपणा, अखंड मधाचा हि मधाळ सर्वकाळ प्रखर आत्मबोध ।।३।। निवृत्ति ताटात कृपेच्या पूर्ण अमृताची वाढ करून गहिनीनाथरूप श्रीगुरु- कासवी दूध देते ।।४।।
भावार्थ:
कासवीचे दुध फक्त तिच्या पिला पुरते असते तर कामधेनुचे दुध तिच्या वासरासकट सर्वांसाठी वापरता येते. गाय जशी सर्वांना दुध देऊन तृप्त करते तसे परब्रह्म सर्वांच्या इच्छा पूर्ण करतो. तोच परमात्मा आपल्या डोळ्यांनी दिसणाऱ्या सुकुमार सावळा बाळकृष्ण यशोदेचा पुत्र बनुन गोकुळात आला आहे. जसे वृक्ष एका विशिष्ट काळात मधुर, आंबट तुरट फळे देतात तसे काळाचे बंधन ह्या परमात्म्याला नाही तो भक्ताला कालातीत होऊन तृप्त करतो. निवृत्तिनाथ म्हणतात कासवी जशी आपल्या पिलास दुध देऊन वाढवते तसे भंगवता तुम्ही मला हे ज्ञानामृत देत आहात.