०४० निर्दोषरहित सर्व गुणीं हेत

निर्दोषरहित सर्व गुणीं हेत ।
द्वैत विवर्जित अरूप सदां ॥१॥
तें रूप स्वरूप कृष्ण बाळलीला ।
माजि त्या गोपाळा सदा वसे ॥२॥
गुणागुणी धीट वासना अविट ।
तद्रूप प्रगट निरंजन ॥३॥
विकार विवर्जित विवरण सोपे ।
अकार पैं लोपे एका नामें ॥४॥
निःसंदेह छंद वासनेचा कंद ।
ब्रह्माकार भेद नाहीं सदा ॥५॥
निवृत्ति परिवार ब्रह्मरूप गोकुळीं ।
वृंदावन पाळी यमुनातटीं ॥६॥
सरलार्थ:
जे दोषरहित व सर्व गुणांनी परिपूर्ण, द्वैतावांचुन सदैव रूपशून्य आहे ।।१।। ते परब्रह्म स्वरूप कृष्णरूपात बाळलीला करीत त्या गवळ्यामध्ये सदैव राहात आहे ।।२।। ते निश्चितच सगुण व निर्गुण असून त्या विषयीची वासना – भावना कधीही विट न आणणारी आहे. त्याचे रूप प्रगटहि आहे व निरंजन-अव्यक्तहि आहे. ।।३।। ते निर्विकार असल्याने त्याचे संबंधी बोलणे सोपे आहे. त्याच्या एका नामानेच हा विश्वाकार लुप्त होतो ।।४।। त्याची आवड निःसंशय धरली असता वासनेचे मूळ नाहिसे होवुन अभिन्न ब्रह्माचा आकार दिसून भेद नित्याचाच नाहिसा होतो ।।५।। निवृत्तिचा गोकुळातील परिवार ब्रह्मरूप असून तो यमुनेच्या तिरावरील वृंदावनांत आहे ।।६।।
भावार्थ:
गुणातित, निर्दोष द्वैत नसलेले अरुप निर्गुण असलेले हे परमात्म स्वरुप आहे. असे ते निर्गुण रूप गोकुळात सगुण कृष्ण रुप घेऊन गोकुळात गोपाळासह लिला करत आहे. ते परब्रम्ह तद्रुप, निरंजन स्वरुपात असुन सगुण साकार होते तेंव्हा त्याला गुण वासना शिवत ही नाहीत. तेच परब्रह्म निर्विकार असुन त्याचा आकार नामात लोप पावतो. व त्या नामामुळे त्याचे विवरण करणे सोपे होते. वासनेचा त्याग करुन त्या परमात्म्याचा छंद धरला तर ते ब्रह्म साधकास प्राप्त होते व त्या साधकापाशी भेद राहात नाही. निवृत्तिनाथ म्हणतात तो परमात्मा त्या वृंदावनात यमुनेतटी राहात होता त्यांच्या सोबत मी परिवारासह होतो.