०४१ परेसि परता पश्यंति वरुता

परेसि परता पश्यंति वरुता ।
मध्यमे तत्त्वता न कळे हरी ॥१॥
तें हें कृष्णरूप गौळियांचे तप ।
यशोदे समीप समीप नंदाघरी ॥२॥
चोखट चोखाळ मनाचे मवाळ ।
कांसवीचा ढाळ जया नेत्रीं ॥३॥
निवृत्ति सर्वज्ञ गुरूची धारणा ।
ब्रह्म सनातना माजि मन ॥४॥
सरलार्थ:
तो परब्रह्म परमात्मा परावाणीच्या पलिकडे व पश्यन्ति वाणीच्याही वर आहे. मध्यमा वाणीस तर तो श्रीहरि कळतच नाही ॥१॥ तेच हे कृष्णाचे रूप जे गवळ्यांच्या जन्मजन्मांतरिच्या तपाचे फळ असुन यशोदामातेच्या जवळ नंदाच्या घरांत खेळत आहे ॥२॥ शुद्ध व स्वच्छ मनाने मवाळ ते असून त्याच्या डोळ्यात कासवीचे तेज आहे ॥३॥ निवृत्ति ठिकाणी नित्य सर्वज्ञ सद्गुरुची धारणा असून त्याचे मन पुरातन परब्रह्मातच लीन आहे ।।४।।
भावार्थ:
तो परमात्मा परेहून परता व पश्यंतीच्या वर आहे. मध्यमेला म्हणजे जिव्हेच्या प्रकाराना ही तत्वता तो कळत नाही. तेच हे कृष्णरुप गौळियांच्या तपामुळे यशोदेच्या निकट नंदाचा घरी अवतीर्ण झाले. तो हा परमात्मा शुध्द, निर्मळ, व कोमल असुन कासवी जशी पिलांना नजरेतुन प्रेमपान्हा देते तसा भक्तांना देत असतो. निवृत्तिनाथ म्हणतात माझ्या सर्वज्ञ श्री गुरुंमुळे तो परमात्मा ब्रह्मसनातन स्वरुपात माझ्या मनात राहतो.