१०१ वैकुंठ दैवत देवामुगुटमणी

वैकुंठ दैवत देवामुगुटमणी ।
ऐकीजे पुराणीं कीर्ति ज्याची ॥१॥
तो हरी बाळक गोपिका कौतुक ।
गोपाळ सकळिक संवगडे ॥२॥
आदि शिवाजप जपतु अमुप ।
तें प्रत्यक्ष स्वरूप नंदाघरीं ॥३॥
निवृत्ति समाधि उगवली सकळिकां ।
तारि तिन्ही लोकां एक्यानामें ॥४॥
सरलार्थ:
वैकुंठातील देव व सर्व देवदेवतांचा मुख्य शिरोधार्य अशी ज्याची पुराणांत आहे ।।१।। तो श्रीहरि बाळरूपाने हा गोपीकांचे आश्चर्य कीर्ति होऊन राहिला आहे व सर्व गोपाळ त्याचे सवंगडी; खेळातील मित्र बनले आहे ।।२।। आदिनाथ भगवान शंकर ज्याच्या नामाचा अमाप जप करीत आहे. तो प्रत्यक्ष रूपाने साक्षात नंदाच्या घरी अवतरला आहे ।।३।। ते उगवलेले तेज जे एका नामस्मरणाने तिन्ही लोकांस तारत आहे ते (निवृत्तिची समाधि स्थिती आहे.) ।।४।।
भावार्थ:
सर्व देवांचा मुकुटमणी असलेला तो वैकुंठाचा देव त्याची कीर्ति सर्व पुराणे उच्चारवाने ऐकवतात.त्या देवाचे संवगडी गोपाळ असुन गोपीका त्याचे कौतुक करताना थकत नाहीत. ज्याचे नाम महादेव शंकर सतत जपत असतात तो नंदा घरी कृष्ण होऊन आला आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, ज्या नामाने तिन्ही लोक तारले जातात ते नाम मला व सर्वांना समाधीचा अर्थ समजवते.
धन्यवाद महाराज
खूप छान उपक्रम श्रीगुरु निवृत्ती महाराज यांच्या चरणी समर्पित…