१०३ गगनींचा गगनीं तेज पूर्ण धरणी

गगनींचा गगनीं तेज पूर्ण धरणी ।
आपणची तरणी जगा यया ॥१॥
ब्रह्म माजीवडे गोपाळ संगती ।
वेद वाखणिती ज्याची महिमा ॥२॥
लोपती त्या तारा हारपे दिनमणि ।
तो खेळे चक्रपाणी गोपाळामाजी ॥३॥
निवृत्ति निधान श्रीरंग खेळतु ।
गोपिकासी मातु हळुहळु ॥४॥

सरलार्थ:

आकाशाचे आकाश व पृथ्वीचे पूर्ण तेज असून जो आपणच या सर्व जगाची तारक नाव आहे ।।१।। ब्रह्म स्वरूपातील हे कृष्णरूप गोपाळांच्या समवेत राहते व ज्याचा महिमा-महत्व वेदहि वर्णन करतात ।।२।। ज्याच्या प्रकाशात तारांगण लुप्त होऊन सूर्यहि हरवतो. तो चक्रपाणी श्रीहरि गवळ्यामध्ये खेळत आहे ।।३।। निवृत्तिचा ठेवा असलेला हा श्रीरंग गोपीकांबरोबर खेळत असून त्यांच्याशी हळुवारपणे गुजगोष्टी करीत आहे. ।।४।।

भावार्थ:

चिदाकाशात आकाश व पृथ्वी यांच्या मध्ये तो कृष्ण सूर्यनारायण बनुन तळपत आहे व जगाला प्रकाशित करत आहे. वेद ज्याची महती गातात तो कृष्णरुप धरुन गोपाळांत वावरत आहे. तो त्या गोपाळांबरोबर खेळण्यात येवढा मग्न आहे की सुर्य व तारे कधी मावळतात याचे भान त्याला नाही. निवृत्तिनाथ म्हणतात, तो खेळगडी बनलेला कृष्ण गोपाळांची खेळता खेळता गौवळींची मन जिंकत आहे.

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *