१०४ निरपेक्षता मन अनाक्षर मौन्य

निरपेक्षता मन अनाक्षर मौन्य ।
प्रकाश संपूर्ण तया ब्रह्मा ॥१॥
ऐसें रूप पाहा क्षरे दिशा दाहा ।
सर्वभावें मोहा एका कृष्णा ॥२॥
नित्यता अढळ नित्यपणें वेळे ।
विकाश आकळे नित्य तेजें ॥३॥
रूपस सुंदर पवित्राआगर ।
चोखाळ साकार पवित्रपणें ॥४॥
नेणें हें विषय आकार न माये ।
विकार न साहे तया रूपा ॥५॥
निवृत्ति तत्पर कृष्ण हा साकार ।
ॐतत्सदाकार हरि माझा ॥६॥

सरलार्थ:

व्यापून आशारहित मन व अक्षर-शब्द रहित मौन तो परमात्मा ब्रह्मदेवाचा पूर्ण प्रकाश आहे. मार्गदर्शक आहे ।।१।। असे ते रूप दाहिहि दिशांना आहे. सर्व भावाने एक कृष्णच सर्व समुदाय बनला आहे ।।२।। तो नित्य अचल असून नित्यकाळ विकासणारा व अंशरहित सततच तेजस्वरूप आहे ।।३।। सुंदर रूपवान, शुद्ध व साठा निर्मळ आणि पवित्रपणाने निर्मळ आहे ।।४।। हा कोणताही विषय जाणत नाही. सर्व आकारवान वस्तूत तोच भरलेला आहे. त्याच्या स्वरुपांत विकार सहन होत नाही ।।५।। श्रीगुरू गयनीनाथ हे अमरगुरू असून तेथे निवृत्ति दक्ष आहे. व माझा श्रीहरि ॐ तद् सत् स्वरूपच आहे ।।६।।

भावार्थ:

सर्व ब्रह्मांडात प्रकाश आहे. तो प्रकाश निरपेक्ष आहे काही न बोलता तो जगताला प्रकाशीत करत असतो. असे जे प्रकाशमय ब्रह्म कृष्ण रुप घेऊन आले असलेल्या मुळे तेच रुप दशदिशा व्यापुन टाकत आहे. ते प्रकाशरुप ब्रह्म आपल्या स्वरुपात कोणताही बदल न करता नित्य प्रकाश देण्याचे कर्म करत आहे.जे रुप प्रसंगानुसार शुध्द व निर्दोष रुप घेते ते सुरेख असुन सर्व शुध्दतेचा जनक आहे. कोणता ही विकार नसलेले ते अकार नसलेले रुप निर्गुण प्रकाशमय आहे. निवृत्तिनाथ म्हणतात,ज्या ब्रह्माचे स्वरुप ॐ तत् सत् असे आहे तोच कृष्णरुप घेऊन साकारला आहे.

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *