११० आद्यरूप सार जेथुनि ओंकार
आद्यरूप सार जेथुनि ओंकार ।
तो प्रणव साचार हारपला ।। १ ।।
तें रूप रामकृष्णनाथ ।
गोपिका कृतार्थ नाम घेतां ।। २ ।।
ब्रह्मांड घडलें समर्थ अनंत घटमठ ।
आपोआप धीट मुनिजना ।। ३ ।।
निवृत्तिचे सार सर्व हा परिकर ।
कृष्णचि साकार बिंबलेसे ।। ४ ।।
सरलार्थ:
जे या सर्व जगाचे आद्य कारण सार रूप आहे व जेथून ओंकाराचा उदय होतो व तो प्रणवरूप ओंकार ज्याच्यात विलीन झाला ।।१।। ते समर्थ असे राम-कृष्णाचे नाम असून गोपिका त्या नामाने परिपूर्ण झाल्या ।।२।। अनंत घटमठादि ब्रह्मांडे ज्याच्या पासून घडले व जे स्वत: सिद्ध स्वयंभूरूपे मुनिजनासाठी आहे ।।३।। हा सर्व जगत्परिवार निवृत्तिचे सारधन असून तो खरोखरीच कृष्णरूपाने साकार झाला आहे. आता सर्वत्र कृष्णरूपाचाच अनुभव येत आहे ।।४।।