११४ विश्वाचा चाळक सूत्रधारी एक
विश्वाचा चाळक सूत्रधारी एक ।
विज्ञान व्यापक ज्ञानगम्य ॥१॥
तें रूप साजिंरे कृष्ण घनः श्याम ।
योगियां परम रूप ज्याचे ॥२॥
शिव शिवोत्तम नाम आत्माराम ।
जनवनसम गोपवेषें ॥३॥
निवृत्ति चाळक सर्वत्र व्यापक ।
आपरूपें एक सर्वत्र असे ॥४॥
सरलार्थ:
जो परमात्मा या विश्वाचा एक सूत्रधारी चालक-प्रेरक आहे. अनुभवरूप, व्यापून असलेला व ज्ञानानेच कळणारा आहे ।।१।। जे शोभिवंत सावळे श्रीकृष्णरूप असून योगीहि ज्याचा श्रेष्ठ जप करतात ।।२।। ईश्वराचाहि ईश्वर असून उत्तम असा हृदयस्थ आत्माराम पण गोकुळींच्या जनसमुदायांत गाईसह वनांत गवळ्याच्या रूपात नटला आहे ।।३।। निवृत्तिनाथ म्हणतात – सर्व चालविणारा व्यापक व आत्मरूपाने सर्व ठिकाणी एकच एक असा तो आहे ।।४।।
भावार्थ:
जगाच्या सर्व सत्तांचे सुत्र हातात असलेला तो विश्वंभर ह्या जगात पुर्ण रुपाने भरले त्याचे ज्ञान झाले की सर्व ज्ञान आपोआप होते. तेच परमात्म स्वरुप सुंदर मेघासारखा श्यामल कृष्णरुप होऊन साकारले आहे तेच रुप योगी ज्या परम स्वरुपाचे ध्यान करतात ते तेच रुप आहे. जे परमतत्व सर्वोत्तम शिवतत्व आहे जे सर्व जन वनात अंशात्मक स्वरुपात आहे तेच शिवतत्व पुर्ण स्वरुपात कृष्णात भरले आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, जे जीवन स्वरुपात सर्वत्र व्यापक स्वरुपात भरलेले आहे व जे जगाचे चालक आहे तसेच मला जाणवले आहे.