११८ निराकृत्य कृत्य विश्वातें पोखितें
निराकृत्य कृत्य विश्वातें पोखितें ।
आपण उखितें सर्वाकार ॥१॥
तोचि हा सावळा डोळ डोळस सुंदर ।
रुक्मिणीभ्रमर कृष्ण माझा ॥२॥
निश्चळ अचळ । नाहीं चळ बळ ।
दीन काळ फळ हारपती ॥३॥
निवृत्ति सोपान खेचर हारपे ।
तदाकार लोपे इये ब्रह्मीं ॥४॥
सरलार्थ:
आपण कर्मरहित असून विश्वाला पोसण्याचे कार्य करीत आहे. तसेच आपण निराकार असून सर्वाचा आकार झाले आहे ।।१।। तोच हा सावळा, देखणा, चांगला व रूक्मिणीचा पती असा माझा कृष्ण आहे ।।२।। तो स्थिर स्वरूप असून त्यांत हालचाल नाही व जगद्रूपाने मात्र चल-हालचाल असलेला व अधिष्ठान रूपाने अचल असलेला सर्वकाळ निःस्पृह असा आहे ।।३।। निवृत्ति, सोपानदेव व विसोबा खेचर हि त्यांत विलीन होऊन या परब्रह्म स्वरूपात तद्रूप झाले आहेत ।।४।।
भावार्थ:
निर्गुण निराकार परमात्मा विविध आकाराने नटलेल्या जगाचा निर्मिता आहे. स्वतःच अनेक आकार धारण करून ह्या जगाचे पोषण ही करतो. श्री रुक्मिणीच्या भोवती हा राहणारा कृष्णभ्रमर जरी सावळा असला तरी सर्वांग सुंदर आहे. अकर्ता निर्गुण परमात्मा हालचाल करत नाही तरी ही त्याच्यामुळे रोज दिवसरात्र होत असतात हे आश्रय आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, नावाने वेगळे असणारे सोपान, खेचर जरी भिन्न वाटत असेल तरी त्यांच्यातील ब्राह्मस्वरूप एकच असल्याने त्यांच्यातील एकत्व मी पाहात आहे.