११९ मथनीं मथन मधुरता आपण
मथनीं मथन मधुरता आपण ।
विश्वीं विश्व पूर्ण सदोदित ॥१॥
तें हे चतुर्भुज मुगुटवर्धन ।
सुंदर श्रीकृष्ण खेळतसे ॥२॥
दुमदुम पाणि दुमिळित ध्यानीं ।
दृढता निशाणीं काष्ठीं लागे ॥३॥
ध्रुवाद्य अढळ ब्रह्म हें अचळ ।
शोखिमायाजाळ निःसंदेहे ॥४॥
क्लेशादि कल्पना क्लेशनिवारणा ।
आपरूपें भिन्न होऊं नेदी ॥५॥
निवृत्ति कठिण गयनिप्रसाद ।
सर्वत्र गोविंद नंदाघरीं ॥६॥
सरलार्थ:
मंथन करणारी ती मथनी रवी, मंथनक्रीया व मंथनाची माधुरी- गोडी हे सर्व आपणच असून या विश्वात विश्वरूपाने सदैव पूर्णत्वाने असलेला परमात्मा ।।१।। तोच चारबाहु व मुकुटाने शोभिवंत सुंदर श्रीकृष्ण खेळत आहे ।।२।। कल्पवृक्षासारखे उदार हात, दुःसाध्य असे ध्यान व काष्टाप्रमाणे कठीण निश्चय ही त्याची खूण आहे ।।३।। ध्रुवासारखे न ढळणारे हे अचल ब्रह्म मायाजाळाचा नि:संशय नाश करते ।।४।। दुःखाची भावना व दुःखाची निवृत्तीहि आपणातच नाहिशी करतो स्वत:हून भिन्न होऊ देत नाही. ।।५।। (कल्पित वस्तुचा नाश हा अधिष्ठान रूपच असतो.) हे सर्व घडणे अवघडच पण श्रीगुरू गहिनीनाथाच्या कृपा प्रसादाने निवृत्तिस सोपे झाले असून सर्वत्र असा गोविंद नंदाच्या घरांत आला आहे ।।६।।
भावार्थ:
मंथन करुन दह्यातुन जसे लोणी व ताक काढले जाते नवनीत शुध्द व ताक असार मानले जाते तसे ह्या परमात्म्याच्यामुळे विश्वातुन चैतन्य सार व जड असार वेगळे निघते हे पूर्णस्वरुपात ह्या विश्वात आहे. तोच परमात्मा चतुर्भुज रुप टाकुन उंच मुकुट धारण करून श्रीकृष्ण बनुन खेळत आहे. पातळ पाणी स्तब्ध होऊन मुळाला मिळाल्यावर झाडाचे लाकुड कठीण स्वरुपाला प्राप्त होते. जसे सर्व वाद्यात शिरस्थान विणेचे अढळ आहे तसेच ब्रह्माचे स्थान अढळ आहे. व तेच ब्रह्म मायाजाळाचे शोषण करुन ब्रह्मस्वरूप दाखवते. त्या ब्रह्मस्वरुपाचे दर्शन झाल्यावर पुर्वजन्मीचे दुःख क्लेष हे त्या जीवाजवळ फिरकु ही शकत नाहीत म्हणजेच तो जीव व ते ब्रह्म यांचे एकरुपत्व होते. निवृत्तिनाथ म्हणतात, गहिनीनाथांच्या प्रसादाने तो सर्वासाठी कठिण असलेला नंदाघरचा परमात्मा मला सोपा झाला.