१२० मन निवटलें ज्ञान सांडवलें
मन निवटलें ज्ञान सांडवलें ।
ठाणदिवी केलें ध्यानालागीं ॥१॥
उमटल्या ध्वनि कृष्ण नामठसे ।
सर्व हृषीकेश भरला दिसे ॥२॥
दिशा दुम ध्यान हारपली सोय ।
अवघा कृष्ण होय ध्यानींमनीं ॥३॥
निवृत्तिमाजि घर मनाचा सुघडु ।
कृष्णचि उपवडु दिसतसे ॥४॥
सरलार्थ:
मनाला मारून मोह टाकून जीव हा ध्यानाकरिता स्थिर दिपस्तंभ करून ठेवला आहे ।। १ ।। कृष्ण नामाची मोहोर-शिक्का घेवून उद्गार प्रगट झाला आहे व सर्व ऋषीकेश परमात्म स्वरूपाने भरलेले दिसत आहे ।। २ ।। ध्यानाचा दिशावृक्ष आता नाहिसा झाला आहे. ध्यान हे ध्येयात विलीन झाले आहे व ध्यानीमनी सर्व कृष्णच झाला आहे ।।३।। आता या जागृत मनाने निवृत्ति हेच घर केले आहे. कृष्णरूपाचीच जागृती सर्वत्र दिसत आहे ।।४।।
भावार्थ:
जसा लामण दिवा लावल्यावर प्रकाश पसरतो तसा परमात्मज्ञानाचा दीप मनात लाऊन विज्ञान म्हणजे संसार ज्ञान टाकुन मनात त्या स्वरुपाचे ध्यान लावले. त्यातुन जो अनुहत ध्वनी श्रीकृष्ण नामाचा प्राप्त झाला व हे जगत त्या हृषीकेषाने विनटले आहे.