१२२ निरशून्य बिंबी आकार पाहतां
निरशून्य बिंबी आकार पाहतां ।
आपण तत्त्वता हरि एकु ॥१॥
तें रूप साबडे कृष्णा माजींवडे ।
सोंवळें उघडें शौच सदा ॥२॥
तेथें वर्ण व्यक्ति कल्पना हरपती ।
मनाच्या खूंटती गती जेथें ॥३॥
निवृत्ति नितंब सोवळा स्वयंभ ।
प्रकाशलें बिंब चहूंकडे ॥४॥
सरलार्थ:
शून्यातीत स्वरूपांत आकार पाहु गेले तर तत्वत: एक श्रीहरि कृष्णच आहे ।।१।। ते भोळेभाळे रूप कृष्णामध्ये शुद्ध व प्रगट रूपात सतत पवित्र आहे ।।२।। त्याठिकाणी, रंग-रूप-कल्पना हे नाहिसे होतात व मनाची गती थांबते ।।३।। तो स्वयंभू सावळा श्रीकृष्ण हीच निवृत्तिची नितंब – कांस आधार असून तेच स्वरूप सर्वत्र प्रगट झाले आहे ।।४।।
भावार्थ:
निरशुन्य आकाशात दिवसा पाहिले तर एकटे बिंब दिसते.तत्वतः त्या बिंबाकडे पाहिल्यास तोच एकत्वाने हरीरुप दिसतो. तेच उघडे परब्रह्म पवित्र व सोवळे कृष्णरुप घेऊन अवतरले आहे. त्यारुपाकडे पाहिल्यावर तेथे वर्ण, व्यक्ती व कल्पना यांचा लय होतो व मनाची गती कुंठित होते. निवृत्तिनाथ म्हणतात, तोच नितळ पवित्र स्वयंभू कृष्ण अवतरला असुन त्याच्या निज प्रकाशाने असे वाटते की चहुकडे सुर्यबिंब प्रकाशित झाले आहे.