१२३ पंचतत्त्व कळा सोविळी संपूर्ण
पंचतत्त्व कळा सोविळी संपूर्ण ।
त्याचेही जीवन जनार्दन ॥१॥
तो सोंवळा संपूर्ण अमृताचा घन ।
त्यामाजि सज्जन हरि आम्हा ॥२॥
नित्यता सोंवळा स्वयंपाकी शौच ।
न दिसे आमुचें आम्हां तेथें ॥३॥
निवृत्ति सोंवळा स्वयंपाकी नित्य ।
नाम हें अच्युत जपतसे ॥४॥
सरलार्थ:
पंचमहाभूत रूपतत्त्वाचे आकार हे सर्व संपूर्णत्वाने सोवळेच आहे. (शुद्ध कारणाचे कार्यहि शुद्धच असणार) त्या सर्वांचे जीवन जगणे जनार्दनच आहे. (अध्यस्त वस्तूचा आधार अधिष्ठानच असतो) ।।१।। तो संपूर्णत्वाने शुद्ध असून अमृताने दाटून भरला आहे. त्यामध्येच हा सत्स्वरूप श्रीहरि आत्मत्वाने आहे ।।२।। तो नित्याचाच पवित्र व स्वत:च परिपक्व व शुद्ध आहे. त्या स्वरूप स्थितीत आम्हीच आम्हाला दिसत नाही ।।३।। निवृत्ति हा नित्यच स्वभाव शुद्ध असून तो या अच्युत श्रीकृष्णाच्या नामाचा जप करीत आहे ।।४।।