१२५ अनंत सृष्टि घटा अनंत नाम मठा
अनंत सृष्टि घटा अनंत नाम मठा ।
परिमाण पैठा आत्माराम ॥१॥
तें रूप साजिरें चतुर्भुजवेष ।
वैकुंठीचे लेख नंदभाग्य ॥२॥
सिद्धीचें साधन चिंतामणि धन ।
कल्पवृक्ष घन वसते जेथें ॥३॥
निवृत्तिचें मूळ गोपाळ सकळ ।
साधक दयाळ हरि होय ॥४॥
सरलार्थ:
या सृष्टितील घट-शरीरे व अनंत नावांचे मठ यांच्यामध्ये व्यापून असलेला एक आत्माच आहे ।।१।। तेच आत्मरूप चतुर्भज नटल्याने शोभत आहे. नंदाच्या भाग्याने हा वैकुंठाचाच घाट येथे आकारास आला आहे ।।२।। प्राप्त वस्तुचे साधन व चिन्तामणिचेच धन, कल्पवृक्ष येथे घनदाट रूपात आहेत ।।३।। सर्व गोपाळ हे निवृत्तिचे मूळ असून साधकावर दया करणारा हा देव आहे ।।४।।
भावार्थ:
अनंत सृष्टी अनंत देह व त्यांची अनंत घरे जरी वेगळी दिसत असली तरी परिणाम पाहिला तर त्यातील परमात्म तत्व एकच आहे. ते वैकुंठातील साजरे चतुर्भुजरुप नंदाच्या भाग्याने त्याला प्राप्त झाले आहे. त्याच परमात्माच्या ठिकाणी सिध्दीचे साधन, चिंतामणी चे धन व कल्पवृक्ष वन वसती करते निवृत्तिनाथ म्हणतात, माझे मुळ मी त्या गोपाळतच पाहिले व सर्व साधकांसाठी दयाळु हरि तेच स्वरुप आहे.