१२६ नित्य निर्गुण सदा असणें गोविंदा
नित्य निर्गुण सदा असणें गोविंदा ।
सगुणप्रबंधा माजि खेळे ॥१॥
तें रूप सगुण अवघेंचि निर्गूण ।
गुणि गुणागुण तयामाजि ॥२॥
अनंत तरंगता अनंत अनंता ।
सृष्टीचा पाळिता हरि एकु ॥३॥
निवृत्ति परिमाण अनंत नारायण ।
सर्वाहि चैतन्य आपरूपें ॥४॥
सरलार्थ:
हा गोविंद श्रीहरि नित्यनिर्गुण स्वरूपातच सदैव असतो. मात्र तो आत्मा सगुण रूपांत खेळत आहे ।।१।। ते त्याचे सगुण रूप संपूर्णतया निर्गुणच आहे. त्या सगुण रूपात गुण व गुणातीतता असे दोन्हीहि सगुण- निर्गुण स्वरुपे आहेत ।।२।। अनंताचा तारक व अनंताचा हि अनंत हा सृष्टिचा पालनकर्ता हरि एकच आहे ।।३।। तो अनंत नारायणच निवृत्तिस प्रमाण भूत- मान्य आहे. त्याच्या रूपानेच हे सर्व चैतन्य ओतप्रोत भरले आहे ।।४।।
भावार्थ:
नित्य निर्गुण निराकार असलेला तो गोविंद सगुण साकार होऊन ह्या सृष्टीच्या निर्मितीचा खेळ खेळतो. सगुण रुपात असताना ही त्या परमात्यात गुणातीत मुळ स्वरुप कायम असते. जरी तो गुणातीत असला तरी त्याच्यात ते सर्व गुण भासतात. अनंत स्वरुप समुद्रात अनंत सृष्टीच्या निर्मितीच्या लाटा येतात व त्या लाटारुपी सृष्टीचा लय ही तिकडेच होतो पण त्या आशा सर्व सृष्टीचा पोषण कर्ता तोच असतो. निवृत्तिनाथ म्हणतात, त्या व्यापक परमात्मा चे स्वरुप मोजायला ही अनंत परिमाणे लागतात व त्या नारायणात ते मुळ चैतन्य जीवनरुपात राहते.