१२७ नामरूपा गोडी ब्रह्मांडा एवढी
नामरूपा गोडी ब्रह्मांडा एवढी ।
द्वैताची परवडी हारपली ॥१॥
तें रूप सुंदर कॄष्णाचें सकुमार ।
सेविती निर्मळ भक्तराज ॥२॥
विराटे अनंत ज्या माजि विरतें ।
नव्हेचि पुरतें शेषादिकां ॥३॥
निवृत्ति लक्ष्मी गरूड चिंतिती ।
तयांचिये मति आकळ हरि ॥४॥
सरलार्थ:
ब्रह्मांडा एवढी महान गोडी या नामरूपाची असल्याने द्वैताचा प्रकार नाहिसा झाला आहे ।। १ ।। ब्रह्मांडात व्यापून असलेल्या नामरूपांत एक परमात्माच असल्याने त्याच्या आवडीने सर्व द्वैत नाहीसे झाले आहे ।।१।। ते कोमल असे कृष्णरूप शक्तिवंत असून देव श्रेष्ठ व भक्तराज त्याचे सेवन करतात ।।२।। त्याच रूपात अनंत विराट रूपे विरून जातात. शेषादिकांसहि ते पूर्णत्त्वाने कळत नाही ।।३।। निवृत्तिनाथ म्हणतात लक्ष्मी व गरुड आदि परिवार त्यांचे चिंतन करतो. पण तो श्रीहरि त्यांच्या बुद्धिस आकलन होत नाही ।।४।।
भावार्थ:
त्या परमात्माच्या नामाची व्यापकता येवढी आहे की त्या ठिकाणी सर्व भेद अभेद होतात. अशा त्या सुंदर, सगुण रुपातील श्रीकृष्ण पूजेच्या सेवेचा लाभ भक्त घेतात. त्या रुपात पासुन सुक्ष्मा सारखी सर्व जगतातील स्वरुपे लय पावतात. ते रुप ज्याच्यावर पहुडले आहे त्या शेषाला ही त्याचे स्वरुप सांगता येत नाही. निवृत्तिनाथ म्हणतात, विष्णुप्रिय निकट असणारे लक्ष्मी व गरुड त्याचे सतत स्मरण करतात. तरी त्यांना ही तो अकळ व राहिला आहे.