१२८ खुंटले साधन तुटलें बंधन
खुंटले साधन तुटलें बंधन ।
सर्वही चैतन्य एकरूप ॥१॥
नाहीं तेथें माया नाहीं तेथें छाया ।
निर्गुणाच्या आया ब्रह्मरूप ॥२॥
चैतन्य साजिरें चेतवी विचारें ।
आपरूपें धीरें विचरत ॥३॥
निवृत्ति म्हणे तें कृष्णरूप सर्व ।
रोहिणीची माव सकळ दृष्टि ॥४॥
सरलार्थ:
आता कृष्ण दर्शन झाल्याने साधन थांबले व संसार बंधनही तुटले व सर्वत्र चैतन्यच एकरूपाने दिसू लागले ।।१।। आता त्यास्थितीत ना माया ना नामरूपाचा आकार, केवळ निर्गुणाचे स्वरूप हे या ब्रह्मरूप कृष्णांत दिसू लागले ।। २ ।। ते सुंदर चैतन्यच सर्वविचारांना प्रेरणा देत आहे व स्वतःच गांभीर्याने संचार करीत आहे ।।३।। निवृत्तिनाथ म्हणतात ते कृष्णरूपच सार सर्वस्व असून अन्य सर्व सृष्टि हे रोहिणी नक्षत्रातील मृगजळाची लीला आहे ।।४।।
भावार्थ:
त्या एक रुप असणाऱ्या चैतन्यामध्ये अविद्ये बंधन नाही व साधक साधन साध्य ही त्रिपुटी ही नाही. त्या रुपाच्या ठिकाणी कोणते ही गुण व आकार नसुन भ्रम करणारे कोणतेही चिन्ह नाही. ते चैतन्य विचारांच्या चेतना जणुकाही पाणी होऊन संपुर्ण पृथ्वीवर पसरत (फिरत) आहेत. निवृत्तिनाथ म्हणतात, ते जगताची सर्व रुपात हे तत्व आविष्कारले असले तरी जगत मृगजळा प्रमाणे मिथ्या असुन त्याचा लय त्याच रुपात निश्चित आहे.