१२९ निकट वेल्हाळ नेणों मायाजाळ
निकट वेल्हाळ नेणों मायाजाळ ।
विव्हळ पाल्हाळ नेणों कांही ॥१॥
तें रूप श्रीधर मानवी अकार ।
सर्व निराकार सिद्धि वोळे ॥२॥
कुटूंबआचार कुळवाडी साचार ।
सर्व हा श्रीधर एका एक ॥३॥
निवृत्ति निगग्न गयनीच प्रतिज्ञा ।
नामें कोटि यज्ञा होतजात ॥४॥
सरलार्थ:
हा जवळचा लाडका मायाजाळ जाणत नाही व दुःखाने ज्यास केविलवाणे करणारा हा प्रपंचाचा विस्तारहि कांही माहित नाही ।। १ ।। तेच हे आदराने, आवडिने मानवी रूप धारण केलेले चांगल्या व प्रभावी पणाने सिद्ध झाले आहे ।।२।। कौटुंबिक कुलधर्म-कुलाचार हे सर्व हा श्रीधर श्रीकृष्ण एकटा एकच सत्यत्वाने नटला आहे ।।३।। गहिनीच्या या बोधज्ञानात निवृत्ति बुडाला असून त्याने कोटी कोटी नामयज्ञ होत आहेत
भावार्थ:
माया व परब्रह्म हे निकट आल्या शिवाय जगत उत्पन्न होत नाही तरी मायेचे मायिक गुण अविद्या, जडत्व, दुःख हे त्या व्यापक ब्रह्माला बंधन करु शकत नाही. ह्या पाल्हाळा पासून ते मुक्त असते. त्या ब्रह्मरुपाने सर्व सिध्दी सह मानवी श्रीधररुपात अवतार घेतला आहे. ते ब्रह्म सर्वापासुन वेगळा एकटे दिसत असले तरी त्याने कुटुंब कबिल्या आचार साचार करुन दाखवला आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, गहिनीनाथानी दिलेल्या प्रतिज्ञेमुळे मी त्या त्याच्या नामात रत असल्यामुळे मला कोटी यज्ञांचे फळ प्राप्त झाले आहे.