१३० रूप हें सावंळे भोगिताती डोळे
रूप हें सावंळे भोगिताती डोळे ।
उद्धवा सोहळे अक्रूरासी ॥१॥
पदरज वंदी ध्यान हें गोविंदी ।
उद्धव मुकुंदीं तल्लीनता ॥२॥
विदुक्र सुखाचा नाम स्मरे वाचा ।
श्रीकृष्ण तयाचा अंगीकारी ॥३॥
निवृत्तीचें ध्यान ज्ञानदेव खूण ।
सोपान आपण नामपाठें ॥४॥
सरलार्थ:
डोळे हे सावंळे रुप भोगत असून उद्धव व अक्रूर हे त्याचे सोहळे करीत आहेत ।। १ ।। प्रभुच्या पायाच्या धुळीचे मस्तकाने वंदन करतात व मनाने गोविंदाचे ध्यान करतात. असे ते उद्धव व अक्रूर श्रीहरि मुकुंद स्वरुपी एकरुप झाले आहेत ।।२।। विदूर सुखाने – प्रेमाने वाणीतून नामस्मरण करतो. कारण श्रीकृष्णाने त्याचा स्विकार केला आहे ।।३।। निवृत्ति, ज्ञानदेव सोपान हे आपणहून नामचिंतनाने श्रीकृष्णाचे ध्यान करतात ।।४।।
भावार्थ:
उध्दव व अक्रुराचे डोळे सगुण सावळ्या कृष्णरुपाचे सोहळे भोगत असतात.मथुरेत नेण्यासाठी आलेल्या अक़ुराने त्या गोकुळाच्या धुळीत उमटलेल्या कृष्णपदाचे पहिले दर्शन घेतले तसे करणारा तो पहिला मथुरावासी होता. त्याच मुकुंद नामात तो उध्दव ही निमग्न आहे. तो विदुरकाका सतत त्या कृष्णरुपाचा जप करत असल्याने श्रीकृष्ण भगवानानी त्याचा अंगीकार केला आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, मी त्या श्रीकृष्ण ध्यानाने, ज्ञानदेव त्या आत्मरुपात त्याची खुण मिळवुन व सोपानदेवानी नामपाठ करुन त्याला आपलासा केला आहे.