१३१ भरतें ना रितें आपण वसतें
भरतें ना रितें आपण वसतें ।
सकळ जग होते तयामाजी ॥ १ ॥
तें रूप पैं ब्रह्म चोखाळ सर्वदा ।
नित्यता आनंदा नंदाघरीं ॥ २ ॥
आशापाश नाहीं घरीं पूर्णापूर्ण ।
सकळ जग होणे एक्यारूपें ॥ ३ ॥
निवृत्ति तटाक ब्रह्म रूप एक ।
जेथें ब्रह्मादिक ध्याती सदा ॥ ४ ॥
सरलार्थ:
ब्रह्म स्वरूप हे भरलेले नाही व रिकामेहि नाही. त्याच्यामध्ये हे सर्व होते व जाते ।।१।। ते ब्रह्मस्वरूप सदैव शुद्ध व नित्यानंद स्वरूप, नंदाच्या घरी आहे ।।२।। आशापाशरहित असे ते पूर्ण व अपूर्णपणाने आहे. ते एक रूप असूनहि सर्व जगाच्या रूपाने नटते. ।। ३ ।। निवृत्ति त्या तिरावर एक ब्रह्मत्वाच्या अनुभवाने उभा आहे. जेथे ब्रह्मदेवादि सर्व नाहिसे होतात ।।४।।
भावार्थ:
ज्या रुपा पासुन ह्या जगता पसारा पसरतो व त्या रुपात लय ही पावतो. ते स्वरुप आपल्या स्थानी कधी रिते व कधी भरते असत नाही. तेच ब्रह्म रुप सदा निर्दोष व आनंदरुप असुन सगुण श्रीकृष्ण रुपात नंदाच्या घरी आले आहे. त्यारुपाला कोणते ही आशापाश, पुर्णापूर्ता वगैरे नाही. सर्व जगताचे ऐक्य त्याच्यात सामावले आहे. निवृत्तिनाथ म्हणतात त्याच रुपाचे सर्व ऋषी मुनी ध्यान करतात मी ही त्या नामसरोवराचा एक तट आहे