१३२ न देखों सादृश्य हारपे पैं दृश्य
न देखों सादृश्य हारपे पैं दृश्य ।
उपनिषदांचें पैं भाष्य हारपले ॥ १ ॥
तें रूप उघडें कृष्णरूप खेळें ।
गोपाळांचें लळे पुरविले ॥ २ ॥
न घडे प्रपंच नाही त्या आहाच ।
सर्वरूपें साच हरि आम्हा ॥ ३ ॥
निवृत्तिचें पर कृष्ण हा साचार ।
सर्व हा आचार कृष्ण आम्हां ॥ ४ ॥
सरलार्थ:
ज्याच्या सारखे तर नाहीच पण जेथे दृश्य व अदृश्य नाहिसे होतात उपनिषदांचे शब्दहि जेथे विलीन झाले ।।१।। ते ब्रह्मस्वरूप प्रत्यक्ष कृष्णरूपात खेळत आहे व गोपाळांचे हट्ट पूर्ण करीत आहे ।। २ ।। हा खोटा प्रपंच ते घेत नाही व त्याच्याशी त्याचे घेणे देणेहि नाही. संबंधही नाही. एक भावरूप तर दुसरे अभावरूप मग संबंध येईलच कसा. (न झाला प्रपंच आहे परब्रह्म । अहं सोहं ब्रह्म आकळले ।।) म्हणून आम्हाला हा एक हरिच सत्य आहे ।। ३ ।। निवृत्तिचे श्रेष्ठ स्वरूप हे सत्य श्रीकृष्णरूपच आहे. माझा सर्व आचार विचार व उच्चारहि कृष्णच आहे ।।४।।
भावार्थ:
जगतात दिसणाऱ्या सर्व वस्तुत त्या स्वरुपाचे अस्तित्व असुन त्या रुपातच त्या सर्व वस्तूंचा लय आहे. त्या स्वरुपाचे वर्णन उपनिषदानाही करता येत नाही. तेच रुप सगुण साकार कृष्णरुप घेऊन गोकुळात अवतरले असुन गोकुळवासीयांचे लाड त्यांच्या बरोबर खेळत आहे. त्या रुपाचे दर्शन जरी होत असले तरी त्याला प्रपंच नाही तोच सर्व जगतातील वस्तूंचे जीवाचे रुप घेऊन हरिरुप दाखवत असतो. निवृत्तिनाथ म्हणतात, सर्वांच्या आचाराचे मुळपीठ असलेला तो कृष्ण असुन त्याच रुपात माझ्या समोर साकार झाला आहे.