१३३ नाहीं त्या आचारु सोंविळा परिवारु
नाहीं त्या आचारु सोंविळा परिवारु ।
गोकुळीं साचारु अवतरला ॥ १ ॥
गाई चारी हरी गोपवेष धरी ।
नंदाचा खिलारीं ब्रह्म झालें ॥ २ ॥
ध्याताति धारणें चिंतिताती मौन्यें ।
योगियांची मनें हारपति ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणें तें वसुदेवकुळीं ।
अवतार गोकुळीं घेतलासे ॥ ४ ॥
सरलार्थ:
जेथे सोवळ्यातील आचार विचारांचा थांग पत्ता नाही ते विशुद्ध परब्रह्म सत्यत्त्वाने गोकुळांत अवतीर्ण झाले ।।१।। ते तेथे गोपवेष धारण करून गाई चारत आहे व त्या ब्रह्मस्वरूप बाळश्रीकृष्णास नंद खेळवीत आहे ।। २ ।। जे ध्यानाने ध्यान करतात व मौन धरुन चिंतन करतात व ज्या स्वरूपांत योगीजनांची मने नाहिसी झाली ।। ३ ।। निवृत्तिनाथ म्हणतात – ते परब्रह्म वसुदेवाच्या कुळांत गोकुळामध्ये अवतार धरून आले आहे.
भावार्थ:
ते परब्रम्ह निर्गुण असल्यामुळे ते कर्मविरहित व विटाळ नसलेले सोवळे स्वरुप असुन तेच सगुण साकार होईन गोकुळात अवतरले आहे. तेच परब्रम्ह यमुनातटी गायी चारते व ब्रह्माने जेंव्हा नंदाची खिलारे चोरली तेंव्हा त्या खिलारांचे ही रुप त्यानेच घेतले.योगी जेंव्हा मौन धारण करुन त्याचे ध्यान करतात तेंव्हा त्यांचे मन ही त्या स्वरुपात हारपुन जाते. निवृत्तिनाथ म्हणतात, त्या रुपाने गोकुळात येऊन नंदाघरी आपला अवतार धारण केला आहे.