१३६ ज्या रूपा कारणें वोळंगति सिद्धि
ज्या रूपा कारणें वोळंगति सिद्धि ।
हरपती बुद्धी शास्त्रांचिया ॥ १ ॥
तें रूप साजिरें गोकुळीं गोजिरें ।
यशोदे सोपारें कडिये शोभे ॥ २ ॥
न संटे त्रिभुवनीं नाकळे साधनीं ।
नंदाच्यां आंगणीं खेळे हरी ॥ ३ ॥
निवृत्ति निधडा रूप चहूं कडा ।
गोपाळ बागडा गोकुळीं वसे ॥ ४ ॥
सरलार्थ:
ज्या परब्रह्म स्वरूपासाठी सिद्धि आपणहून शरण येतात व शास्त्रांच्या बुद्धिहि हारपून जातात ।।१।। ते गोजिरवाणे सुंदर रूप गोकुळात यशोदेला सोपे झाले असून तिच्या कडेवर शोभत आहे ।।२।। जो त्र्यैलोक्यात मावत नाही व साधनांनी प्राप्त होत नाही तो श्रीहरि नंदाच्या अंगणात खेळत आहे ।।३।। निवृत्तिनाथ म्हणतात – ते चहुकडे खेळणारे चांगले रूप गोपालकृष्ण गोकुळांत राहत आहे ।।४।।
भावार्थ:
ज्याच्या रुपाचे वर्णन करताना शास्त्रांची बुध्दी हारपते त्याच्या दारी सर्व सिध्दीही सेवेसाठी तिष्ठत असतात. तेच गोजिरे साजिरे रुप यशोदेच्या कडेवर बसुन गोकुळाला दर्शन देत आहे. जे रुप त्रिभुवनाला दिसत नाही कोणत्याही साधनात अडकत नाही ते नंदाच्या अंगणात खेळत आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, तेच स्वरुप ज्याने सर्व दिशा व्यापल्या आहेत ते गोकुळात संवंगड्यांबरोबर खेळत आहे.