१३८ सूर्यातें निवटी चंद्रातें घोंटी

सूर्यातें निवटी चंद्रातें घोंटी ।
उन्मनि नेहटीं बिंबाकार ॥ १ ॥
तें रूप सावळें योगियाचें हित ।
देवांचें दैवत कृष्णमाये ॥ २ ॥
सत्रावी उलंडी अमृत पिऊनि ।
ब्रह्मांड निशाणी तन्मयता ॥ ३ ॥
निवृत्ति अंबु हें वोळलें अमृत ।
गोकुळीं दैवत नंदाघरीं ॥ ४ ॥

सरलार्थ:

जे परब्रह्मस्वरूप सूर्यास दिपवून टाकते, चंद्रास तर गिळूनच टाकते व मन उन्मनीत स्थिर करते ।।१।। अगबाई ते सांवळे श्रीकृष्णरूप- योगीजनांचे कल्याणस्वरूप आहे व सर्व देवदेवतांचे दैवत आहे ।।२।। सत्रावी आत्मस्थिती ओलांडून ब्रह्मानुभावाचे अमृतपान होते. ब्रह्मांडासी एकरूप होणे ही तेथील खूण आहे ।।३।। निवृत्तिच्या आकाशातून हे नामामृत प्रवृत्तिच्या नामरूपात ते श्रीहरिरूप दैवत आपोआप गोकुळांत नंदाच्या घरी आले आहे ।।४।।

भावार्थ:

योग्यांच्या ध्यानात चंद्ररुपाला बाजुस करुन ज्ञानसुर्याचा शोध घेतला जातो. व त्या ज्ञानसुर्याचा बिंबाकार ते योगी मनात ठसवतात. चंद्र म्हणजे अंधार व सूर्य प्रकाश हे अज्ञान व ज्ञानाचे रुपक आहे. तेच ज्ञानबिंब सावळे रुप धारण करुन सर्व देवांचे दैवत झाले असुन तेच योग्यांना हितकार आहे. योगी चंद्राच्या सतरावीतुन ते नामामृत घेऊन आपल्या मनात ब्रम्हांडाचे स्वरुप म्हणुन धारण करतात. निवृत्तिनाथ म्हणतात, नंदाच्या घरी तेच दैवत अवतरले असुन ते नामामृत त्याने मला ही पाजले आहे.


Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *