१४० भावयुक्त भजतां हरी पावे पूर्णता
भावयुक्त भजतां हरी पावे पूर्णता ।
तो गोकुळीं खेळता देखों हरी ॥ १ ॥
मुक्तीचे माजीवडे ब्रह्म चहूंकडे ।
गौळणी वाडेकोडें खेळविती ॥ २ ॥
नसंपडे ध्यानीं मनीं योगिया चिंतनी ।
तो गोकुळीचें लोणी हरी खाये ॥ ३ ॥
निवृत्तिजीवन गयनीनिरूपण ।
तो नारायण गोकुळीं वसे ॥ ४ ॥
सरलार्थ:
भावभरित अंत:करणाने भजन केले असता तो श्रीहरि पूर्णत्वाने प्राप्त होतो. तो श्रीकृष्ण गोकुळांत खेळतांना आम्ही पाहतो ।।१।। मुक्तस्थितिमध्ये चहुकडे दिसणारे ब्रह्मस्वरूप बाळकृष्णरूपास सर्व गौळणी मोठ्या कौतुकाने खेळवितात ।।२।। जो श्रीहरि योग्यांना ध्यानात व ज्ञान्यांना उन्मनी अवस्थेत सांपडत नाही. तो श्रीहरि परमात्मा गोकुळातील गौळणींचे लोणी मटमट खात आहे ।।३।। सद्गुरू गयनीचे हे संकीर्तन निवृत्तिचे चांगले दिव्यजीवन आहे. तोच बाळकृष्ण प्रत्यक्ष गोकुळांत राहतो आहे. ।।४।।
भावार्थ:
पुर्ण समर्पण भावाने त्याचे नामस्मरण केले तर तर हरि पुर्णत्वाने प्राप्त होतो. तोच बाळकृष्ण बनुन गोकुळात खेळत आहे. तो मुक्तीदाता सर्व बाजुने जगात कोंदला आहे मात्र सगुण रुपातील त्याला, गवळणी कडेवर खेळवतात. जो परमात्मा योग्यांच्या ध्यानात सापडत नाही तोच गोकुळात लोणी चोरुन खातो. निवृत्तिनाथ म्हणतात, गहिनीनाथानी त्याचे स्वरुप मला समजवल्यामुळे त्या गोकुळात राहणाऱ्या नारायण मी समजु शकलो.