१४१ जेथुनीया परापश्यंती वोवरा
जेथुनीया परापश्यंती वोवरा ।
मध्यमा निर्धारा वैखरी वाहे ॥ १ ॥
तें रूप सुंदर नाम तें श्रीधर ।
जेणें चराचर रचियेलें ॥ २ ॥
वेदाचें जन्मस्थान वेदरूपें आपण ।
तो हा नारायण नंदाघरी ॥ ३ ॥
निवृत्ति दैवत पूर्ण मनोरथ ।
गोपिकांचें हित करि माझा ॥ ४ ॥
सरलार्थ:
ज्याच्या ओसरीत बैठक घरात परा, पश्यन्ती, मध्यमा या चार वाणी निश्चयाने वावरतात ।। १।। ते श्रीधराचे रूप व नाम सुंदर असून त्याने हे चराचर विश्व निर्माण केले आहे ।।२।। वेदांची उत्पत्ती व वेदांचे रूपहि तो आपण स्वतःच आहे तो हा नारायण नंदाच्या घरी वावरत आहे ।।३।। तो निवृत्तिचे दैवत असून त्याने सर्व मनोरथ पूर्ण होतात. तो गोपीकांचे कल्याण हा माझा श्रीहरि आहे ।।४।।
भावार्थ:
परा, पश्यंती, मध्यम, वैखरी हे वाणीचे सर्व प्रकार परमात्माचे वर्णन करु शकत नाहीत व शेवटी आपल्या हद्दीतील ओवरीत निवांत पडुन राहतात. तो नितांत सुंदर अ़सलेला श्रीधर ह्या चराचराचा निर्माता आहे. वेदांचे जन्मस्थान असलेला तो वेदरुप परमात्मा नंदाघरी नारायण झाला आहे.निवृत्तिनाथ म्हणतात, तो गोपिकांचे हित करणारा माझा देव माझे मनोरथ पूर्ण करतो.