१४३ श्यामाचि श्यामशेज वरी
श्यामाचि श्यामशेज वरी ।
तेज विराजे सहजें केशिराज क्षीरार्णवीं ॥ १ ॥
शेषशयन अरुवारी गोविंद क्षीरसागरीं ।
तो नंदयशोदेघरीं क्रीडतुसे ॥ २ ॥
अनंत नामीं क्षीर क्षरलासे साचार ।
गोपिकासमोर हरीराजा ॥ ३ ॥
नाहीं योगिया दृष्टि मनोमयीं करि सृष्टि ।
पाहातां ज्ञानदृष्टी विज्ञान हरि ॥ ४ ॥
शांति नेणें क्शमे पारु विश्रांतिसी अरुवारु ।
तो कैसा पा उदारु गोपाळांसी ॥ ५ ॥
विचाराचें देटुगें आकार निराकार सांगे ।
तो गोसावी निगे गोकुळीं रया ॥ ६ ॥
निवृत्तीचें परब्रह्म नामकृष्ण विजय ब्रह्म ।
चिंतितां चिंताश्रम नासोनि जाय ॥ ७ ॥
सरलार्थ:
काळ्या सावळ्याच्या सावळ्या सेजेवर आत्मतेजाने तो केशिराज सहजच त्या क्षीरसागरात शोभू लागला ।। १ ।। क्षीर समुद्रामध्ये तो गोविंद सहजतेने शेषाच्या शयनावर पहुडलेला आहे. व तोच नंद यशोदेच्या घरी खेळ खेळत आहे ।।२।। अनंत नामांचे दूध खरोखरीच त्यापासून पाझरले आहे. तो हरिराज गोपीका समोर उभा आहे ।।३।। जो योग्यांच्या दृष्टिस दिसत नाही व मनासंकल्पनेच सृष्टी करतो त्यास ज्ञानदृष्टीने पाहिल्यास विज्ञान-विपरीत ज्ञानरूप प्रपंच तो हरण करून टाकतो ।।४।। ज्याच्या शांती व क्षमेचा अंत नाही जेथे विश्रांती ही सहजच विश्रांती लाभते. तो श्रीहरि गोपाळावर कसा एवढा उदार झाला आहे ।।५।। विचाराचाच ठसठशीत पणा ज्याचे निराकार स्वरूप सांगतो. अरे राजा, तो विश्वाचा स्वामी गोकुळांत निगे-निगा राखत आहे. देखरेख करीत आहे. रक्षण करीत आहे ।।६।। ते निवृत्तिचे विजयस्वरूप परब्रह्म श्रीकृष्ण, चित्ताने चिंतिले असतां चिंतेच श्रमच नष्ट होतात (चिन्ता ते पळाली गोकुळा बाहेरी । प्रवेश भितरी केला देवे।।) ।।७।।
भावार्थ:
त्या श्याम रंग परमात्म्याच्या रंगामुळे आकाशच श्याम रंगात रंगुन त्याची शय्या झाले व त्या श्याम रंगामुळे क्षिरसागर ही अलौकिक निल तेजाने चमकत आहे. जो परमात्मा क्षिरसागरात शेषशय्येवर आहे तोच नंद यशोदेच्या घरात खेळत आहे. ज्याने क्षिरसागराची निर्मीती केली तोच परमात्मा गोपीकांसाठी हरिराज आहे. जे योगी मनाच्या दृष्टीने स्थुल जगताला पाहतात तेंव्हा ते जगत मिथ्या मायिक आहे हे त्यांना समजत नाही. व ज्ञानदृष्टी देऊन तोच हरि ते मायिक विज्ञात्वाला दुर करतो.जो परमात्मा शांती व क्षमेचे विश्रांतीस्थान आहे. किंवा ह्या दोन्ही त्याच्याजवळ वस्ती करतात.तो गोपाळांची कामे करत आहे. ज्याला विचारवे की तुझे मुळ रुप कोणते तर तो ठसठसशीत (देटुगे) पणे निराकार निर्गुण सांगतो तो गोसावी कृष्ण होऊन गोकुळात राहतो. निवृतिनाथ म्हणतात,त्याचे नुसते नाम घेतली की विजय होतो त्याच्या चिंतनाने चिंता दुर होते अ़सा ते चिंतामणी नाम आहे.