१४८ अष्टांग सांधनें साधिती पवन
अष्टांग सांधनें साधिती पवन ।
ज्यासि योगीजन शिणताती ॥ १ ॥
तो हा कृष्ण गोपीगोपाळांमाझारी ।
क्रीडा नानापरी करी आत्मा ॥ २ ॥
अठरा साहिजणें बोलती परवडी ।
तो माखणासि जोडी स्वयें कर ॥ ३ ॥
निवृत्तीचें ध्येय कृष्ण हाचि होय ।
गयनिनाथें सोय दाखविली ॥ ४ ॥
सरलार्थ:
योगी लोक ज्याच्यासाठी अष्टांग योगादि साधने करून प्राणावर विजय मिळवतात व शीण पावतात ।।१।। तो हा आत्मस्वरूप बाळकृष्ण गोपी व गोपाळामध्ये नानाप्रकारचे खेळ खेळतो ।।२।। अठरा पुराणे व सहा शास्त्रे या संबंधी नानाप्रकाराने बोलतात तो परमात्मा लोणी खायला द्यावे यासाठी स्वत: हात जोडतो ।।३।। निवृत्तिचे ध्येय श्रीकृष्ण हेच आहे व तो मार्ग सद्गुरू गयनीनाथाने दाखविला आहे ।।४।।
भावार्थ:
अपानाचा निरोध करुन योगी जन अष्टांग साधना करुन शिणतात तरी त्यांना अप्राप्य असलेला हा कृष्ण बनुन हा परमात्मा गोपाळांबरोबर अनेक खेळ सहज खेळत आहे. ज्याचे वर्णन सहा शास्त्रे व अठरा पुराणे परावाणीने करतात तो गोपिंकांना हात जोडुन लोणी मागतो. निवृतिनाथ म्हणतात, गहिनीनाथानी मार्ग दाखवल्या प्रमाणे माझे ध्येय ते श्रीकृष्ण रुपच झाले आहे. व त्याच्याशी मी एकरुप होतो.