१४९ अंधारिये रातीं उगवे हा गभस्ति
अंधारिये रातीं उगवे हा गभस्ति ।
मालवे ना दीप्ति गुरुकृपा ॥ १ ॥
तो हा कृष्ण हरि गोकुळामाझारी ।
हाचि चराचरीं प्रकाशला ॥ २ ॥
आदि मध्य अंत तिन्ही जाली शून्य ।
तो कृष्णनिधान गोपवेषे ॥ ३ ॥
निवृत्तिनिकट कृष्णनामपाठ ।
आवडी वैकुंठ वसिन्नले ॥ ४ ॥
सरलार्थ:
अंधाऱ्या रात्रीत उगवलेला हा सूर्य, गुरूकृपेने त्याचा प्रकाश नाहिसा होत नाही ।।१।। तोच हा श्रीहरि कृष्णरूपाने गोकुळामध्ये चराचरात प्रकाशरूपे प्रगट झाला आहे ।।२।। जेथे आरंभ, मध्य व शेवट हे नाहिसे झाले आहे. तो श्रीकृष्ण ठेवा गोपांच्या वेषांत साकार झाला आहे. आता निवृत्तिजवळ केवळ कृष्ण या नामाचा पाठ आहे. नामाच्या आवडीने वैकुंठ स्वरूप परब्रह्मच तेथे राहिले आहे ।।४।।
भावार्थ:
गुरुकृपेने अंधाऱ्या रात्री म्हणजे अज्ञानाच्या रात्री ज्ञानसुर्य उगवतो व त्या सुर्याला मावळणे माहित नाही. तोच श्री कृष्ण गोकुळात अवतरल्या मुळे चराचराला ज्ञानप्रकाश प्राप्त झाला आहे. भुत भविष्य व वर्तमाना हे त्रिकाल ज्याच्यात शुन्य होतात तो परमात्मा गोपवेश धारण करुन कृष्ण बनला आहे. निवृतिनाथ म्हणतात आवडीने त्याचे नाम घेतल्यामुळे ते वैकुंठपीठ माझ्या जवळ वस्तीला आले आहे.