१५० दुभिले द्विजकुळी आलें पैं गोकुळी
दुभिले द्विजकुळी आलें पैं गोकुळी ।
नंद यशोदे जवळी बाळकृष्ण ॥ १ ॥
खेळे लाडेकोडें गौळणी चहूंकडे ।
नंदाचें केवढे भाग्य जाणा ॥ २ ॥
ज्या रूपें वेधलें ब्रह्मांड निर्मळे ।
तेंचि हें आकारले कृष्णरूपें ॥ ३ ॥
निवृत्ति दिवटा कृष्णाचिया वाटा ।
नामेचि वैकुंठा पावन होती ॥ ४ ॥
सरलार्थ:
यादव या क्षत्रिय द्विजाच्या कुळात जन्म घेवून ते गोकुळात बाळकृष्ण रूपाने नंद-यशोदे जवळ आले आहे ।।१।। ते गौळणीच्या आजुबाजुने चहुकडे लाडाने व कोडकौतुकाने खेळत आहे. नंदाचे दैव केवढे मोठे आहे हे तुम्हीच जाणा ।।२।। ज्या निर्मळ रूपाने सर्व ब्रह्मांड वेधून घेतले तेच या कृष्णरूपाने आकारास आले आहे ।।३।। निवृत्ति हा दिवा कृष्ण या वाटेवर आहे व नामाने ते वैकुंठास प्राप्त होतात ।।४।।
भावार्थ:
ज्याचे दोहन ब्रह्मनिष्ठांनी केल्या मुळे तो पान्हावला व तो नंद यशोदे चा बाळकृष्ण म्हणुन गोकुळात आला. तोच लाडाकोडाने गौवळणींबरोबर खेळणारा कृष्ण नंदाघरी आल्याने त्याच्या भाग्याला पार नाही. ज्याच्या रुपामुळे ह्या ब्रह्मांडाची निर्मिती झाली. तोच कृष्णरुप घेऊन अवतरला आहे. निवृतिनाथ म्हणतात, ज्याच्या नामाने वैकुंठ पावन झाले त्यांच कृष्णनामाची दिवटी करुन मी साधना पथावर वाटचाल करत आहे.