१५१ विश्वीं विश्वपती असे पैं लक्ष्मीनाथ

विश्वीं विश्वपती असे पैं लक्ष्मीनाथ ।
आपणचि समर्थ सर्वांरूपी ॥ १ ॥
तें रूप गोकुळीं नंदाचिये कुळीं ।
यशोदे जवळी बाळकृष्ण ॥ २ ॥
सर्वघटी नांदे एकरूपसत्ता ।
आपणचि तत्त्वतां सर्वांरूपी ॥ ३ ॥
निवृत्तीचें पार कृष्णचि पै सार ।
गोकुळीं अवतार नंदाघरीं ॥ ४ ॥

सरलार्थ:

हा लक्ष्मीचा स्वामी विश्वाचा मालक होऊन विश्वात आहे. तो आपणच सर्व रूपाने समर्थ आहे ।।१।। तेच रूप गोकुळांत नंदाच्या कुळांत यशोदेच्या जवळ बाळकृष्ण रूपात आहे. सर्व शरीररूप घरामध्ये एकचएक सत्ता नांदत आहे. सर्वरूपाने तत्त्वतः आपणच नटला आहे ।।३।। तो सार स्वरूप श्रीकृष्णच निवृत्तिचा शेवट आहे. जो गोकुळांत नंदाच्या घरी अवतरला आहे ।।४।।

भावार्थ:

लक्ष्मीचा पती असलेला परमात्माच ह्या विश्वाचा आधिपती असुन तोच सर्वरुपानी समर्थ आहे. तोच परमात्मा गोकुळात, नंदाच्या कुळात यशोदेचा बाळ कृष्ण आहे. आपणच जगताच्या सर्व रुपात अंशात्मक असल्याने त्याच्या रुपाने जगात एकत्मता आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, गोकुळात नंदाघरी अवतरलेल्या कृष्णाचे नाम हे माझे सार आहे व तेच मला पार करणार आहे.

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *