१५२ जेथें नाहीं वेदु नाहीं पै शाखा
जेथें नाहीं वेदु नाहीं पै शाखा ।
द्वैताचा हा लेखा हरपला ॥ १ ॥
तें रूप वोळलें नंदायशोदे सार ।
वसुदेवबिढार भाग्ययोगें ॥ २ ॥
नमाये पुरत ब्रह्मांडाउभवणी ।
त्यालागीं गौळणी खेळविती ॥ ३ ॥
निवृत्ति ब्रह्मसार सेवितुसे सोपें ।
नामें पुण्यपापें हरपती ॥ ४ ॥
सरलार्थ:
ज्या स्वरूपात वेदाला व त्याच्या विविध शाखांनाहि स्थान नाही. व द्वैताचे तर मोजमापच नाहीसे झाले आहे ।।१।। ते सर्वांचे साररूप नंद यशोदेला आपणहून प्राप्त झाले वसुदेवाच्या भाग्याने तो बाळकृष्ण बिऱ्हाड करून वस्तीला आला आहे. ।।२।। जो ब्रह्मांडाच्या रचनेत मावत नाही. त्याला गौळणी आपल्या मांडीवर खेळवतात ।। ३ ।। परब्रह्मस्वरूपाचे सार जो बाळकृष्ण त्याचे सुलभपणाने निवृत्ति सेवन करीत आहे व त्या नामाने पुण्यपापे नाहिसे होऊन जातात. ।।४।।
भावार्थ:
जेथे चारी वेदांना व श्रुती, स्मृती सारखा त्यांच्या शाखाना त्याचे वर्णन जमले नाही. ते वर्णन करण्याची त्यांची शक्तीच हरपली.ते साररुप परब्रह्म वसुदेवाच्या कुटुंबात जन्मले व नंद यशोदेला पुत्र म्हणुन मिळाले. ज्याने ब्रह्मांडे निर्मिले त्याचे माप करण्यास सगळी मापे थोकडी आहेत त्याला त्या गौवळणी सहज अंगावर खेळवतात. निवृतिनाथ म्हणतात, हे त्या कृष्णनामाचे सहज सोपे सार असुन त्याच्या नामामुळे पाप पुण्य दोन्ही हरपतात.