१५४ ध्यानाची धारणा उन्मनीचे बीज
ध्यानाची धारणा उन्मनीचे बीज ।
लक्षितां सहज नये हातां ॥ १ ॥
तें हें कृष्णनाम सखे नंदघरी ।
गौळियां माझारी ब्रह्म खेळे ॥ २ ॥
न दिसे पाहतां शेषादिका गति ।
यशोदे श्रीपति बाळ झाला ॥ ३ ॥
गुंतलें मायाजाळीं अनंत रचनें ।
तो चतुरानना खुणें न संपडे ॥ ४ ॥
नकळे हा निर्धारू तो देवकी वो देवी ।
शेखीं तो अनुभवीं भुलविला ॥ ५ ॥
निवृत्ति रचना कृष्णनामें सार ।
नंदाचें बिढार ब्रह्म झालें ॥ ६ ॥
सरलार्थ:
ध्यानाचे ठिकाण व उन्मनीचे मूळ बीज हे पाहु गेले असता सहज हाताला येत नाही ।।१।। अग सखे ते हे कृष्णरूप नंदाच्या घरी गवळ्यामध्ये ब्रह्मस्वरूपाने खेळत आहे ।।२।। शेषादिकांना पाहुनही ज्याची गती दिसत नाही तो लक्ष्मीपति यशोदेचे लाडके बाळ झाला आहे ।।३।। अनंत ब्रह्मांडाची रचना करतांना जो ब्रह्मदेव मायाजाळात गुरफटला आहे तो ब्रह्मदेवहि याचे स्वरूप जाणू शकत नाही ।।४।। हा निश्चय देवी देवकीसहि कळत नाही तो शेवटी अनुभवानेच वेडावला आहे ।।५।। ते ब्रह्मस्वरूपाचे सार कृष्ण हाच निवृत्तिचे रचनात्मक ध्येय आहे. विश्वाधिष्ठान ब्रह्माने नंदाच्या घरी वास्तव्य केले आहे ।।६।।
भावार्थ:
ध्यानाची धारणा व योग्यांच्या उन्मनी अवस्थेचे बीज जरी त्यांचे लक्ष असले तरी ते त्यांना सहज सापडत नाही.तेच परब्रह्म कृष्णनाम धारण करुन गौळ्यांबरोबर खेळत आहे. ज्यांची गती व त्याचे स्वरुप त्याच्या जवळ असणारे शेषादिक जाणु शकले नाहीत तोच यशोदेचा बाळ श्रीपती झाला आहे. ज्याने मायाधीन होऊन ह्या विश्वाची निर्मीती केली त्या ब्रह्मदेवाला हे त्याचे स्वरुप सापडले नाही. कारागृहात व बाहेर अनेक चमत्कार दाखवुन ही त्याचे स्वरुप देवकी व वसुदेवाला समजले नाही ते त्याला पाहुनच भुलले. निवृतीनाथ म्हणतात त्याच्यामुळे त्या नंदाचा सर्व परिवारच ब्रह्मरुप झाला त्या कृष्णनामाला मी सार म्हणुन वाङमयात रचले आहे.