१५५ चतुरानन घन अनंत उपजती
चतुरानन घन अनंत उपजती ।
देवो देवी किती तयामाजि ॥ १ ॥
तेंचि हें सांवळें अंकुरलें ब्रह्म ।
गोपसंगे सम वर्ते रया ॥ २ ॥
निगमा नाठवे वेदाचां द्योतुकु ।
तो चतुर्भुज देखु नंदाघरीं ॥ ३ ॥
निवृत्ती म्हणे शंखचक्रांकितमूर्ति ।
आपण श्रीपति क्रीडतसे ॥ ४ ॥
सरलार्थ:
मोठमोठे ब्रह्मदेव असंख्य उत्पन्न होतात. त्यामध्ये कित्येक देव व देवी आहेत ।।१।। ते ब्रह्म सावळ्या कृष्णरूपाने अंकुरले आहे. (त्या ब्रह्मासच कृष्णाकाराचा अंकुर फुटला आहे) व राजा तेच ब्रह्म गोपाळांच्या संगतीत सारखेपणाने वागत आहे. समत्वाने वावरत आहे ।।२।। जो वेदांचा प्रकाशक श्रीहरि वेदासहि आठवत नाही. तो चार बाहुंचा श्रीहरि नंदाच्या घरी आधीन झाला आहे ।। ३ ।। श्रीनिवृत्तिनाथ म्हणतात ती शंख, चक्र चिन्हाकिंत मूर्ती श्रीलक्ष्मीपति आपण स्वत: खेळत आहे ।।४।।
भावार्थ:
त्याच्या स्वरुपात कित्येक देव देवता नव्हे नव्हे ब्रह्मदेव ही उपजतो. तेच ब्रह्मस्वरुप सावळे सुंदर रुप घेऊन त्या गोपाळांबरोबर समानतेची वर्तणुक करताना दिसते. तेच परब्रह्म वेदांचे द्योतक असुन ही वेदांने ते समजत नाही. तोच चतुर्भुज परमात्मा नंदाचा कृष्ण झाला आहे. निवृतिनाथ म्हणतात, शंखचक्रांकित असलेला लक्ष्मीचा मालक गोकुळात नवनविन क्रिडा करतो आहे.